तरूणांना कमी वयात का येतोय हार्ट अटॅक? जाणून घ्या कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:31 AM2023-12-16T09:31:24+5:302023-12-16T09:33:20+5:30
Heart Attacks : डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की, हार्ट अटॅक केवळ वयोवृद्ध लोकांना येतो. वय हृदयाला सुरक्षित करत नसतं.
Heart Attacks : अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरूवारी हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याच्यावर अॅंजिओप्लास्टी करावी लागली. श्रेयस त्याचा आगामी सिनेमा 'वेलकम टू जंगल'चं शूटींग करत होता. तेव्हाच त्याला त्रास जाणवला. मग त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनुसार त्याची तब्येत आता बरी आहे. या घटनेने पुन्हा एकदा तरूणांमध्ये हृदयरोगाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधलं आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की, हार्ट अटॅक केवळ वयोवृद्ध लोकांना येतो. वय हृदयाला सुरक्षित करत नसतं. जीवनशैली आणि जेनेटिक्स हृदयाच्या आरोग्यात महत्वाची भूमिका निभावतात.
तरूणांमध्ये हार्ट अटॅकची कारणं
परिवाराचा इतिहास
जेनेटिक्समुळे कमी वयातही हृदयाच्या समस्यांच्या शक्यतांना प्रभावित करू शकतात. जर परिवारात कमी वयात हृदयरोगाचा इतिहास असेल, तर व्यक्तींनी आपल्या हृदयाबाबत जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.
जुने आजार
डायबिीस, हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या हृदयरोगांचा धोका जास्त वाढवतात. वेळीच यावर उपचार घेतले नाही किंवा काळजी घेतली नाही तर स्थिती गंभीर होऊन हृदयरोगांचा धोका वाढतो.
तणाव आणि लाइफस्टाईल
जास्त तणाव, चुकीचं खाणं-पिणं, व्यायाम कमी करणं आणि धूम्रपान अशा गोष्टींमुळे तरूणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे. अशात तणाव कमी घेणे आणि हृदयासाठी चांगली लाइफस्टाईल फॉलो करणं गरजेचं आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष
तरूणांमध्ये हृदयासंबंधी समस्यांची लक्षणं वेगवेगळी दिसतात. बऱ्याचदा यांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याना सामान्य समजलं जातं. छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अस्पष्ट वेदना यांसारख्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
शारीरिक मेहनतीची कमतरता
आपल्या शरीरासाठी जितका आहार गरजेचा असतो तितकाच त्या आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात 500 ते 950 कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल महत्वाची असते. जर तुम्ही शरीराची फार हालचालच करत नसाल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते.
वजन वाढणं
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वजन कमी ठेवायला हवं. जाडपणा ही सवय नाहीये, हा चुकीचं खाणं-पिणं आणि अंसतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जाडेपणा उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टेंस यांचं नेतृत्व करतो. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
चुकीचं खाणं-पिणं
कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार हृदयाचा सर्वात चांगला मित्र असतो. ट्रान्स फॅटमुळे हृदय रोगाची समस्या अधिक वाढते. ओमेगा -3 फॅटी अॅसिडने भरपूर पदार्थ हृदय रोगाची शक्यता कमी करतात. फास्ट फूडच्या सेवनामुळे हृदय रोगाची शक्यता अधिक वाढते.