ब्रेन स्ट्रोकमध्ये ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:38 AM2023-08-07T08:38:12+5:302023-08-07T08:38:24+5:30

हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसतो, त्याच पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर ब्रेन स्ट्रोक येतो.

Why is 'golden hour' important in brain stroke? | ब्रेन स्ट्रोकमध्ये ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

ब्रेन स्ट्रोकमध्ये ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

googlenewsNext

- डॉ. अविनाश गुट्टे, 
 इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट
नेकवेळा घरातील एखाद्या सदस्याला पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) आला की, घरातील सदस्यांची धावपळ सुरू होते. त्यांना नेमकं काय करावे कळत नाही, कोणत्या डॉक्टरकडे जावे कळत नाही. कुणी जवळच्या डॉक्टरकडे नेतात, कुणी तत्काळ घरीच काही घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा वेळी नेमकं काय करावे हे कळणे गरजेचे आहे. नातेवाइकांनी रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये (६ ते ८ तास) रुग्णालयात भरती करणे अपेक्षित आहे. हृदयरोगानंतर ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे.

हृदयाला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसतो, त्याच पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यावर ब्रेन स्ट्रोक येतो. मेंदूद्वारे सर्व अवयवांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. जर मेंदूच्या एखाद्या रक्तवाहिनीत अडथळा आला तर त्या संबंधित अवयवाच्या कार्यात बाधा निर्माण होते. मग त्यामध्ये काही वेळा तोंड वाकडे होते. अर्धे शरीर पंगू होते. रुग्णाला दीर्घकालीन अपंगत्व, बोलताना आणि गिळताना त्रास होतो. काही वेळेला उपचार वेळेत मिळाले नाही तर मृत्यूसुद्धा ओढवतो. 

ब्रेन स्ट्रोकच्या पहिल्या प्रकारात मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. तर दुसऱ्या प्रकारात मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तपुरवठा थांबतो. त्यांनतर रुग्णांना ब्रेन स्ट्रोकची लक्षणे दिसण्यात सुरुवात होते. यामध्ये रुग्णालयात रुग्णाला आणल्यानंतर तत्काळ सीटी स्कॅनच्या चाचणीनंतर निदान करून नेमके काय झाले, हे जाणून उपचाराची दिशा ठरविण्यास मदत होते. दुसऱ्या प्रकारात आम्ही रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिनीमध्ये झाली आहे, ती काढून रक्तपुरवठा सुरळीत करतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘मॅकेनिकल डिव्हाइस थ्रोम्बएक्टॉमी’ असे म्हणतात. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर रक्तस्राव झालेल्या रुग्णांमध्ये कोणते उपचार करायचे याचा निर्णय न्यूरॉलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन परिस्थिती बघून निर्णय घेतात. काही वेळेस औषधोपचार तर कधी शस्त्रक्रिया करावी लागते.

सर्वसाधारणपणे ४० वर्षानंतर स्ट्रोकचे रुग्ण दिसतात. मुंबई महापालिकेच्या आणि शासनाच्या रुग्णालयात या आजारावर चांगले उपचार होतात. फिजिओथेरपिस्ट मोलाची भूमिका बजावतात. नियमित फिजिओथेरपीने रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.

काय कारणे असू शकतात? 
उच्च रक्तदाव, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, धूम्रपान, दारूचे व्यसन, आनुवंशिकता, अपुरी झोप, ताणतणाव

लाखामागे ८४२ रुग्ण 
शहरी भागात १ लाख लोकांमागे ८४२ लोकांना ब्रेन स्ट्रोक येतो तर ग्रामीण भागात त्याची नोंद व्यवस्थित होत नसल्याने तेथे १ लाखांत २२० लोकांना स्ट्रोक येत असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Why is 'golden hour' important in brain stroke?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.