तुमचं बाळ एवढं का रडतं? कॉलिकचा त्रास होत असेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:42 AM2022-06-06T08:42:12+5:302022-06-06T08:42:46+5:30

नुकतं जन्माला आलेलं बाळ रडण्याचं प्रमाण कधी कमी होईल? या प्रश्नाचं सामान्यतः गुगलवर मिळणारं उत्तर असतं ते म्हणजे ५ ते ६ आठवडे !

Why is your baby crying so much? Could colic be a problem? | तुमचं बाळ एवढं का रडतं? कॉलिकचा त्रास होत असेल का?

तुमचं बाळ एवढं का रडतं? कॉलिकचा त्रास होत असेल का?

googlenewsNext

“आमच्याकडे नुकतं जन्मलेलं तान्हं बाळ खूप रडतं हो डॉक्टर… ते नॉर्मल आहे का? का त्याला काही होत असेल?” “बाळाचं रडणं कमी कधी होईल?” “बाळाला कॉलिकचा त्रास होत असेल का? एवढं का रडतंय ते?”

घरात कितीही अनुभवी माणसं / बायका / आज्या वगैरे असतील, तरी तान्हं बाळ रडायला लागलं की सगळ्या घराचा जीव खालीवर होतो. आधी घरातले लोक एकमेकांना असे प्रश्न विचारतात आणि मग न राहवून डॉक्टरला फोन करतात. त्यातही आजच्या काळातले आईबाबा असतील, तर ते पटकन गुगल करतात. नुकतं जन्माला आलेलं बाळ रडण्याचं प्रमाण कधी कमी होईल? या प्रश्नाचं सामान्यतः गुगलवर मिळणारं उत्तर असतं ते म्हणजे ५ ते ६ आठवडे !

बहुतेकवेळा डॉक्टरदेखील असंच सांगतात की साधारण पाच आठवड्यानंतर बाळाचं रडणं कमी होईल. कारण याबाबत बरेच जण १९६२ साली अमेरिकेत झालेल्या अभ्यासावर अवलंबून असतात. या अभ्यासात बाळाच्या आयुष्यातल्या पहिल्या बारा महिन्यांचा अभ्यास केला गेला होता; मात्र या साठ वर्षांपूर्वीच्या अभ्यासात हाती लागलेल्या निष्कर्षांना छेद देणारे निष्कर्ष एका ताज्या अभ्यासात हाती आलेले आहेत.

डेन्मार्कमधल्या आर्हस विद्यापीठात केलेल्या या अभ्यासात १७ देशातील पालकांकडून माहिती गोळा करण्यात आली. त्याव्यतिरिक्त या विषयावरील ५७ संशोधनांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या पालकांनी दररोज त्यांची तान्ही बाळं किती वेळ रडतात याच्या नोंदी केल्या होत्या. या अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की बाळाचं रडणं पाच ते सहा आठवड्यानंतर अचानक बऱ्यापैकी कमी होईल या मान्यतेला विशेष आधार नाही. पाच ते सहा आठवड्यानंतर बाळाच्या रडण्यात असा कुठलाही गुणात्मक फरक दिसून येत नाही. उलट बाळाच्या दृष्टीने बारा महिन्यांनंतरही संवाद साधण्यासाठी रडणं हा महत्त्वाचा मार्ग असतो.

या अभ्यासात वापरल्या गेलेल्या गणिती मॉडेल्समधून दोन निष्कर्ष समोर आलेले आहेत. एकात असं दिसतं की बाळाचं रडणं सुमारे चार आठवड्याच्या वयाला सगळ्यात जास्त असतं. दुसरा निष्कर्ष असा आहे की, बाळं सुरुवातीचे काही आठवडे एका विशिष्ट पातळीला खूप रडतात आणि त्यानंतर ती पातळी कमी होते; मात्र या दोनही अभ्यासांमध्ये कुठेही असं आढळून आलं नाही की बाळाचं रडणं चार, पाच किंवा सहा आठवड्यानंतर एकदम कमी होतं.

मात्र गुगलपासून डॉक्टरपर्यंत सगळ्यांच्या हाती आता असलेल्या अभ्यासानुसार पालकांना असंच सांगितलं जातं की बाळाचं रडणं पाच आठवड्यानंतर एकदम कमी होईल; मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही आणि मग आपलं बाळ का रडतंय हे न कळून पालक एक तर धास्तावून जातात किंवा बाळ उगाच रडतंय असा त्यांचा समज होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी होणं बाळासाठी किंवा त्याच्या पालकांसाठी चांगलं नाही. आपलं बाळ उगाच फार रडतंय असं पालकांना वाटण्याने बाळ आणि पालक या दोघांच्याही मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम त्यांच्यातील नात्यावरदेखील होऊ शकतो.

अगदी लहान बाळाच्या दृष्टीने रडणं हे संवाद साधण्याचं साधन असतं. त्याला काय होतंय, काय वाटतंय हे मोठ्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते रडण्याचा वापर करतं. त्याचवेळी त्याच्या रडण्याला मोठ्या माणसांकडून, त्यातही पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यातून ते बाळ अनेक गोष्टी शिकत असतं. बाळाने रडणं आणि मोठ्यांनी त्याला प्रतिसाद देणं यातून बाळाचा भावनिक विकास होत असतो. त्यामुळेच हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. बाळ वर्षाचं होऊन गेल्यानंतरसुद्धा ते त्याचं म्हणणं मोठ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रडतं हे एकदा लक्षात आलं की पालक बाळाच्या रडण्याकडे त्या दृष्टीने बघू शकतात. बाळ का रडतंय त्याचा विचार करू शकतात. त्याच्या रडण्यामागचं कारण नाहीसं करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि या सगळ्यातून त्यांचा बाळाबरोबरच बंध अधिकाधिक घट्ट करू शकतात.

डॉक्टरांचं काम अधिक महत्त्वाचं !
या अभ्यासात योगदान देणाऱ्या ख्रिस्तीन पार्सन यांचं म्हणणं आहे, की “हा अभ्यास पालकांनी आणि त्याहीबरोबर बाळांच्या डॉक्टर्सनीदेखील समजून घेतला पाहिजे. त्या म्हणतात की डॉक्टरला हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. कारण बाळाच्या रडण्याबद्दल पालकांना माहिती देण्याचं, त्यांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम डॉक्टर्स करत असतात.”

Web Title: Why is your baby crying so much? Could colic be a problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य