वय वाढले की झोप कमी का होते? माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:50 AM2021-05-28T05:50:11+5:302021-05-28T05:51:13+5:30

Health Tips: निसर्गात एक नियम आहे ईफ यू डोंट युज, यू लुज इट! जी गोष्ट (शरीरातील) वापरली जाणार नाही ती तुम्ही गमावता! आपल्या स्नायूंच्या बाबतीतदेखील हेच तंतोतंत लागू आहे.

Why sleep decreases with age? | वय वाढले की झोप कमी का होते? माहिती आहे का...

वय वाढले की झोप कमी का होते? माहिती आहे का...

Next

- डॉ. अभिजित देशपांडे
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस 
iissreports@gmail.com)

निसर्गात एक नियम आहे ईफ यू डोंट युज, यू लुज इट! जी गोष्ट (शरीरातील) वापरली जाणार नाही ती तुम्ही गमावता! आपल्या स्नायूंच्या बाबतीतदेखील हेच तंतोतंत लागू आहे. जसजसे वय वाढत जाते, तसतशी तुमच्या शरीरातील स्नायूंची संख्या कमी होते आणि ते संदेश पाठवायला लागतात की हे काम आमच्याने होणार नाही.  हे संदेश वाढायला लागले की आपोआपच  चिंतातुरपणा येऊ लागतो; आणि डोक्याची चिंता वाढली, की अन्य कुठलेही कारण नसताना झोपेवर परिणाम करणारच. वय वाढत गेले तशी चिंताही वाढत गेली, तर झोप कमी लागते, त्यामागे नेमके हेच कारण आहे! यात आपण एक लक्षात घेतले पाहिजे की चिंतेची पातळी ही त्या व्यक्तीकरिता विशिष्ट असते. म्हणजे दारासिंग बलभीम असल्याने त्याच्या चिंतेची पातळी कमी आणि तुम्ही सर्वसामान्य शरीरयष्टीचे असल्याने तुमची पातळी त्याच्यापेक्षा अधिक असे नाही. तर दारासिंगने त्याचे स्नायू गमावले असता त्याची वैयक्तिक चिंतेची पातळी वाढेल आणि तुमचे स्नायू वाढले तरी पातळी निश्चितच खाली येईल. गेल्या आठवड्यात आपण कारखाना मालकाचे जे रूपक वापरले, ते आठवून पाहा. एकेक कामगार कमी होत गेला, तसतसा वेळेत माल तयार करू शकण्याचा त्याचा आत्मविश्वास उणावत गेला, आणि मग त्याच्या चिंतेची पातळी वाढली... आणि अर्थातच झोपही उडाली. कामाची नवी व्यवस्था लावून उत्पादनाचा वेग वाढवणे, हा त्याच्या समस्येवरचा मार्ग होय! 

वयानुसार कमी होत जाणाऱ्या, हरवत चाललेल्या आपल्या झोपेचा प्रश्न हलका करण्याचा मार्गही नेमका हाच आहे :  स्नायूवर्धन करणे! मेंदूमध्ये छोट्या बदामाच्या आकाराचे दोन भाग असतात त्यांना ॲमीग्डाला असे म्हणतात. मेंदूकडून आपल्या स्नायूंना सूचना जातात हे माहिती आहेच; पण, स्नायूकडूनदेखील उपसूचना (फीडबॅक) मेंदूतील भागांना आणि या ॲमीग्डालाकडे दिल्या जातात, हे सिद्ध झालेले आहे.

पाठीचा कणा ताठ झाला की आत्मविश्वास वाढतो हे चाचण्यांमध्ये दाखविण्यात आले आहे. संबंध हठयोग शास्त्रात स्नायू आणि सांधे यांच्या विशिष्ट अवस्थेमुळे आपण स्वभावात होणारे फरक यावर विवेचन आहे. आता हे स्नायूवर्धन कसे करावे? त्याबाबत पुढील लेखात विचार करूयात. 

Web Title: Why sleep decreases with age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.