घटस्फोटीत आणि विधुर पुरूषांना महिलांच्या तुलनेत हृदयरोगाने मृत्युचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:32 AM2019-06-11T11:32:16+5:302019-06-11T11:36:52+5:30
अभ्यासकांचा उद्देश हे जाणून घेणं होतं की, हार्ट अटॅक आल्यावर विवाहित व्यक्तीची जगण्याची शक्यता किती असते. खासकरून महिलांमध्ये.
हृयरोगामुळे होणाऱ्या मृत्युचा संबंध घटस्फोटीत जीवनाशी सुद्धा आहे. हे आम्ही सांगत नाही तर एका रिसर्चमधून समोर आलं आहे. ब्रिटीश अभ्यासकांनुसार, घटस्फोटीत पुरूषांना हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका घटस्फोटीत महिलांच्या तुलनेत अधिक असतो. तसेच असे पुरूष ज्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे, त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचा धोका ११ टक्के अधिक असतो. हा रिसर्च बर्मिंघमच्या एस्टन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आला.
कसा केला रिसर्च?
अभ्यासकांचा उद्देश हे जाणून घेणं होतं की, हार्ट अटॅक आल्यावर विवाहित व्यक्तीची जगण्याची शक्यता किती असते. खासकरून महिलांमध्ये. हे समजून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी उत्तर इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये रिसर्च केला गेला. या रिसर्चमध्ये तब्बल १८ लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हे असे लोक होते ज्यांना २००० आणि २०१४ दरम्यान हार्ट फेल्युअर किंवा अनियंत्रित हार्टबीटची समस्या होती.
विवाहित पुरूषांमध्ये हृदयरोगाने मृत्युचा धोका कमी
अभ्यासकांनुसार, असे घटस्फोटीत पुरूष जे आधीपासूनच अनियंत्रित हार्टबीटच्या समस्येशी लढत आहेत. त्यांना हार्ट फेल्युअर होण्याचा धोका ११ टक्के आणि मृत्युचा धोका १३ टक्के अधिक असतो. तर अनियंत्रित हार्टबीटने पीडित विवाहित पुरूषांना महिलांच्या तुलनेत मृत्युचा धोका केवळ ६ टक्के असतो.
अविवाहित पुरूषांची स्थिती अधिक चांगली
अविवाहित पुरूषांमध्ये अविवाहित महिलांच्या तुलनेत हार्ट फेल्युअरचा धोका १३ टक्के कमी असतो. भास्कर डॉट कॉमला एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरूषांमध्ये हा फरक असण्याचं कारण त्यांच्याकडे असलेली मदत किंवा मदत मागणे हे असू शकतं. ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनचे असोसिएट मेडिकल डायरेक्टर मेटिन एवकिरन यांच्यानुसार, हार्ट अटॅक, अनियंत्रित हार्टबीट आणि हार्ट फेल्युअर या तिनही स्थिती आयुष्य कमी करतात.