Wild Polio: मोझांबिकमध्ये 30 वर्षांनंतर आढळला 'वाइल्ड पोलिओ'चा रुग्ण, नेमका कसा पसरतो हा व्हायरस..?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:09 PM2022-05-22T20:09:47+5:302022-05-22T20:09:59+5:30
आफ्रीकन देश मोझांबिकमध्ये तीन दशकांनंतर वन्य पोलिओचा रुग्ण आढळला आहे. एका लहान मुलाला अर्धांगवायुचा झटका आल्यानंतर त्याच्यात पोलिओचा विषाणू असल्याचे निदान झाले.
नवी दिल्ली: आफ्रीकन देश मोझांबिकमध्ये तीन दशकांनंतर वन्य पोलिओचा(Wild Polio) रुग्ण आढळला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मलावीमध्ये याचे प्रकरण सापडले होते. त्यानंतर 1992 नंतर मोझांबिकमध्ये या आजाराची ही पहिलीट घटना घडली आहे. आफ्रिकेसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांच्या मते, या व्हायरसचा रुग्ण सापडणे चिंतेचा विषय आहे. तसेच, हा किती धोकादायक आणि किती वेगाने पसरू शकतो, हाया अभ्यास करणे गरजेचे आहे.
पाकिस्तानी स्ट्रेनशी संबंधित
2020 मध्ये आफ्रिकेला वन्य पोलिओमुक्त घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता सापडलेले प्रकरण जास्त धोकादायक असण्याचे कारण नाही, अशी माहिती WHO ने दिली आहे. पोलिओ निर्मूलनामुळे पोलिओ जवळ-जवळ नष्ट झाला आहे. पण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या काही देशांमध्ये याची प्रकरणे आढळला. आता मोझांबिकमधील ताजे प्रकरण ईशान्य टेटे प्रांतातील आहे. संक्रमित मुलाला मार्चमध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. जीनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर त्याला पोलिओ झाल्याची पुष्टी झाली. या पोलिओचे स्ट्रेन 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रसारित झालेल्या पोलिओशी आणि मलावीमध्ये आढळलेल्या रुग्णाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिओ म्हणजे काय?
पोलिओ किंवा पोलिओमायलिटिस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा मुख्यतः विष्ठेद्वारे आणि दुषित पाण्यातून पसरतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेमध्ये आढळतो. रोगाची लागण झालेले लोक शौच केल्यानंतर हात धुत नाहीत आणि त्यामुळे तो इतरांमध्ये पसरू लागतो. या विषाणूमुळे मुलांमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो आणि ते अपंगदेखील होऊ शकतात. काहीवेळा हा विषाणू प्राणघातकही ठरतो.
काय आहेत याची लक्षणे
पोलिओ व्हायरसची लागण झालेल्या 100 पैकी सुमारे 72 लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पोलिओ व्हायरस संसर्ग असलेल्या 4 पैकी 1 व्यक्तीमध्ये किंवा 100 पैकी 25 मध्ये फ्लूसारखी लक्षणे आढळलात. याशिवाय, घसा खवखवणे, ताप, थकवा, मळमळ, डोकेदुखी आणि पोटदुखी, ही लक्षणे 2 ते 5 दिवस टिकतात आणि नंतर स्वतःच निघून जातात.
प्रतिबंध आणि उपचार
पोलिओ लस या विषाणूशी लढण्यास मोठी मदत करते. पोलिओ लसीचे सर्व डोस मिळालेली मुले या विषाणूपासून संरक्षित राहतात. त्यामुळेच लहान मुलांना नेहमी पोलिओ लस घेण्याचा सल्ला दिला जातो. पोलिओपासून बचाव करणाऱ्या दोन प्रकारच्या लसी आहेत.
1- निष्क्रिय पोलिओव्हायरस लस (IPV)- रुग्णाच्या वयानुसार पाय किंवा हातामध्ये इंजेक्शन म्हणून दिली जाते. 2000 पासून युनायटेड स्टेट्समध्ये फक्त IPV वापरला जात आहे.
2- तोंडी पोलिओव्हायरस लस (OPV)- अजूनही जगाच्या अनेक भागांमध्ये वापरली जाते. तीन वर्षात एकही पोलिओ रुग्ण न आढळल्यामुळे जानेवारी 2014 मध्ये भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला होता. 13 जानेवारी 2011 रोजी देशात वन्य पोलिओव्हायरसचे शेवटचे प्रकरण आढळून आले होते.