2024 हे रोबोटचे वर्ष असेल का? या तंत्रज्ञानाचे आरोग्य क्षेत्रात तोटे काय आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:40 PM2024-01-04T13:40:34+5:302024-01-04T13:42:00+5:30
गेल्या दहा वर्षात गूगल सर्चवर रोबोटिक जॉईंट सर्जरीविषयी माहिती शोधली जाण्याचे प्रमाण चार पटींनी वाढले आहे.
(डॉ विनय एस जोशी, कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक/जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन,
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)
आरोग्य देखभाल क्षेत्रात रोबोटिक किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर वाचायला मिळणे आता काही नवीन उरलेले नाही. ही चर्चा जाणकारपणे केली जात आहे की कुतूहलापोटी की तंत्रज्ञान नवीन आहे म्हणून की हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रुग्णांसाठी लाभदायक ठरत आहे म्हणून...
गेल्या दहा वर्षात गूगल सर्चवर रोबोटिक जॉईंट सर्जरीविषयी माहिती शोधली जाण्याचे प्रमाण चार पटींनी वाढले आहे. स्वतःची रोबोटिक साधने सादर करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये भरपूर स्पर्धा आहे हे वेगळे सांगायला नकोच. मी गेली २५ वर्षे पारंपरिक गुडघा प्रत्यारोपण करतो आहे आणि गेल्या एक वर्षापासून रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सर्जरी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रोबोटिक सर्जरीच्या प्रोत्साहक परिणामांविषयी मी अधिक ठामपणे बोलू शकतो.
प्रसिद्ध आर्थ्रोप्लास्टी सर्जन जॅकोफ्सी एकदा म्हणाले होते, "रोबोटिक तंत्रज्ञान सादर करण्यात आल्यानंतर उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली नाही, अचूकतेमध्ये सुधारणा झाली नाही आणि पुढे जाऊन खर्चात घट झाली नाही असे आजवर एकाही उद्योगक्षेत्रात घडलेले नाही."
रोबोटिक नी सर्जरी काय आहे आणि त्यामध्ये कशाचा समावेश असतो?
रोबोट स्वतंत्रपणे ऑपरेट करत नाही. रोबोट स्वतः कोणतेही निर्णय घेत नाही. सर्जनच्या हाताशिवाय रोबोट काहीही करत नाही.
रोबोटिक असिस्टेड सर्जरीचा साधासोपा अर्थ असा की, सर्जनला रोबोटचे साहाय्य मिळालेले असते. ऑपरेटिंग सर्जन सर्जरीची योजना बनवतात आणि रोबोटला सूचना देतात. रोबोट फक्त सर्जनला चुका टाळण्यात आणि सर्जरी सर्वात जास्त अचूकपणे करण्यात मदत करतो.
रोबोटिक नी सर्जरीमध्ये रुग्णाच्या गुडघ्याची थ्रीडी इमेज तयार केली जाते जी फक्त त्या व्यक्तीसाठी पूर्णपणे अनोखी असते. त्यानंतर गुडघा हलवला जातो जेणेकरून कोणते लिगामेंट घट्ट किंवा शिथिल आहेत हे रोबोट समजून घेऊ शकतो.
त्यानंतर सर्जन थ्रीडी मॉडेलवर सर्जरीची योजना बनवतात. त्या योजनेनुसार अतिशय अचूकपणे सर्जरी पार पाडण्यासाठी रोबोट सर्जनाची मदत करतो.
गुडघा प्रत्यारोपण सर्जरीमध्ये रोबोटिक्सचे फायदे काय आहेत?
1. प्रगत सर्जिकल प्लॅनिंग
2. अधिक जास्त अचूकता
3. लिगामेंट स्पेअरिंगचे अधिक जास्त पर्याय
4. रुग्णाला ऑपरेशननंतर कमी वेदना होतात.
5. हालचाली अधिक चांगल्याप्रकारे करता येतात आणि डिस्चार्ज लवकर मिळतो.
सर्जनला असलेले ज्ञान, त्यांचे नियोजन नैपुण्य आणि नवीन रोबोटिक तंत्रज्ञानामुळे योजनेची अचूक अंमलबजावणी असे दोन्हीकडचे लाभ या नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला मिळतात.
गुडघा प्रत्यारोपण सर्जरीमध्ये उत्कृष्ट परिणाम मिळवण्याची गुरुकिल्ली असते नी अलाइनमेंट जी फुलटाईम सर्व्हिस देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्धअसते. योग्य पद्धतीने अलाइन करण्यात आलेला गुडघा दीर्घकाळपर्यंत टिकतो, अधिक जास्त हालचाली वेदना न होता करता येतात. याउलट चुकीच्या पद्धतीने अलाइन करण्यात आलेल्या गुडघ्यामुळे वेदना, अस्थिरता आणि गुडघा लवकर निकामी होण्याला सामोरे जावे लागते.
पुराव्यांवरून हे सिद्ध झाले आहे की, रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंटमध्ये अलाइनमेंट आणि अचूकता पारंपरिक गुडघा प्रत्यारोपणाच्या तुलनेत अधिक चांगली असते. रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंटमध्ये हाडे आणि मऊ टिश्यू कमी प्रमाणात कापले जातात, त्यामुळे ऑपरेशननंतर रुग्णाला फार वेदना होत नाहीत, अधिक जास्त हालचाली करता येतात, हॉस्पिटलमध्ये जास्त काळ राहावे लागत नाही, सहाजिकच हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संसर्गांची शक्यता कमी होते.
या तंत्रज्ञानाचे तोटे काय आहेत?
या तंत्रज्ञानासाठी खर्च, उपलब्धता, पोहोच आणि विशेष प्रशिक्षित सर्जन हे सर्व असणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाकडे अनावश्यक सेवा म्हणून पाहिले जाते, तथापि अधिक सरकारी समर्थनामुळे हे तंत्रज्ञान आरोग्य सेवा वितरणात एक गेम चेंजर ठरू शकते.
भारतामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीची सद्यस्थिती
महागडा खर्च, अपुरे विमा पेमेंट आणि सरकारी पाठिंब्याचा अभाव यामुळे या प्रगत तंत्रज्ञानाची पोहोच महानगरांमधील रुग्णालये व उच्च सामाजिक-आर्थिक वर्गातील रुग्णांपुरते मर्यादित राहिली आहे.
खर्चाबाबत बोलायचे झाल्यास, प्रत्येक नवीन तंत्रज्ञानासाठी थोडा अतिरिक्त खर्च करावाच लागतो. जागरूकता आणि मागणी जसजशी वाढत जाईल तसतसा खर्च कमी होत जाणारच आहे. 'मंत्रा' या स्वदेशी रोबोटिक आर्मसारख्या सुविधा आल्यामुळे भारतात रोबोटिक तंत्रज्ञानाचा खर्च हळूहळू कमी होत जाईल.
जागरूकतेमध्ये वाढ, खर्चाचे पुरेपूर मूल्य वसूल करून देण्याची क्षमता आणि भरपूर मागणी यामुळे सरकारला सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. रोबोटिक तंत्रज्ञान यापुढे कायम टिकून राहणार यात काहीच शंका नाही आणि दरवर्षी नवीन, अधिक चांगले रोबोट येत राहतील, त्यासोबत उपयुक्तता व जागरूकता वाढणारच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी २०२४ हे क्रांतिकारी वर्ष ठरेल.