जन्माला आलेले बाळ बहिरे तर नाही ना? जाणून घ्या, बाळाच्या बहिरेपणाची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:59 PM2024-03-16T12:59:25+5:302024-03-16T13:01:38+5:30
बाळ जन्माला आले की, कुटुंबातील सदस्य सर्व आनंदी असतात. त्यावेळी बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे की नाही, याची खातरजमा केली जाते.
Health Tips : बाळ जन्माला आले की, कुटुंबातील सदस्य सर्व आनंदी असतात. त्यावेळी बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे की नाही, याची खातरजमा केली जाते, तसेच बाळाचे वजन व्यवस्थित आहे ना हे विचारले जाते. त्याला बाहेरून काही शारीरिक व्यंग तर नाही ना, याची माहिती डॉक्टरांकडून घेतली जाते. मात्र, फारसे कुणी बाळाला ऐकायला येते आहे की नाही, याबाबत फार कुणी विचारणा करत नाही. कारण आजही आपल्याकडे याबाबत फारशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे काही बाळांमध्ये घरी गेल्यानंतर ऐकू येत नसल्याचे कळल्यावर मग कुटुंबातील सदस्यांची धावपळ सुरू होते. कान- नाक- घसातज्ज्ञांच्या मते बाळाच्या जन्माच्या एका दिवसापासून ते वयाच्या पाच वर्षांपर्यंत बाळाला ऐकू येते की नाही, यासाठी पाच मिनिटांची चाचणी सर्व पालकांनी बाळा जन्मल्यानंतर शक्यतो तात्काळ करून घ्यावी.
हजारात ३ जन्मत: बहिरे -
एक हजार बाळांमध्ये तीन बाळ जन्मतः बहिरे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या बाळाच्या जन्मानंतर चाचणी करून घ्यावी. त्यामुळे जर काही दोष असतील त्यावर तत्काळ उपचार करणे शक्य होते.
बाळाच्या बहिरेपणाची कारणे -
कानाची नस काही बाळांमध्ये विकसित झालेली नसते, तर दुर्मीळ जन्मजात काही आजार असतील तर बाळाला काही वेळ कान नसतो.
लहान मुलाचे लसीकरण ज्यापद्धतीने केले जाते. त्याप्रमाणे लहान बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांना ऐकू येते की नाही हे पाहणारी ओटोकॉस्टिक एमिशन चाचणी बंधनकारक केली पाहिजे. बाळ मोठे झाल्यानंतर चाचणी करत बसण्यापेक्षा जितक्या शक्य लवकर ही चाचणी करावी, म्हणजे पुढील गुंतागुंत वाढत नाही. आमच्याकडे बाळ येताच आम्ही त्याची तात्काळ चाचणी करून त्यांना बाळाची श्रवणशक्ती कशी आहे, हे सांगतो. बाळाला ऐकूच येत नसेल तर ते बोलणार कसे, असे विविध प्रश्न उभे राहतात. बाळाला ऐकू येत नसेल तर आता कॉक्लियार इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यामुळे बाळाला चांगले ऐकू आणि बोलता येते.- डॉ. श्रीनिवास चव्हाण, विभागप्रमुख, कान- नाक- घसा विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची शक्यतो लवकर एक महिन्यापर्यंत बाळाला ऐकू येते की नाही, याची तपासणी करून घ्यावी. त्या चाचणी करण्यासाठी फार वेळ लागत नाही. काही मिनिटांत ही चाचणी केली जाते
बाळातील बहिरेपणा कसा ओळखाल?
१) सर्वसामान्यांना बाळाचा बहिरेपणा ओळखणे कठीण जाते. आपल्याकडे खेळण्याचे आवाज दाखवून तो त्याकडे बघतो की नाही हे पहिले जाते.
२) मात्र, वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रीय चाचणी करण्यात येते. त्याला ओटोकॉस्टिक एमिशन (ओएई) असे म्हटले जाते.
३) कानात मोबाइलसारखे असणाऱ्या उपकरणाचा आधार घेऊन त्याची ही चाचणी केली जाते. यामध्ये तुमचा कानाचा आतील भाग पहिला जाऊन श्रवणशक्ती आहे की नाही, ते पहिले जाते.