आईकडून बुद्धी, तर बाबांकडून मिळताे टेन्शनचा वारसा; तब्बल १८ संशोधन, रिपोर्ट वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 06:38 AM2024-02-12T06:38:06+5:302024-02-12T06:38:29+5:30
तब्बल १८ जागतिक संशोधनांच्या निष्कर्षांचा अर्क
नवी दिल्ली : घरात नवजात अर्भकाचे आगमन होत नाही तोच, तो नेमका आईवर गेला की बाबांवर याच्या चर्चा सुरू होतात. मुलगा मोठा झाल्यानंतर भांडणातही निघते की, तो अगदी आईवर किंवा बाबांवर गेलाय; पण तब्बल १८ जागतिक संशोधनांच्या निष्कर्षांतून हे वाद संपुष्टात येऊ शकतील. कारण मुलांना बुद्धीचा वारसा आईकडून, तर वडिलांकडून टेन्शन घेण्याचा वारसा मिळत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले.
केंब्रिज विद्यापीठाच्या २०१६ च्या अभ्यासानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये ग्लासगो वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या अभ्यासात याची पुष्टी झाली.
मुलांची बुद्धिमत्ता ठरविते एक्स गुणसूत्र
मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी एक्स गुणसूत्र जबाबदार असल्याचे संशोधनात म्हटले आहे. स्त्रियांमध्ये दोन्ही एक्स गुणसूत्र असल्यामुळे, मुलांना वडिलांच्या तुलनेत आईकडून बुद्धिमत्ता मिळण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुषांमध्ये एक एक्स गुणसूत्र आणि एक वाय गुणसूत्र असते. पुरुषांमध्ये आढळणारे ‘वाय’ गुणसूत्र घाई, राग आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरील तणाव इत्यादीशी संबंधित आहे. त्यावर संशोधनात शिक्कामोर्तब झाले.
३५ वर्षांच्या मातांची मुले अधिक हुशार, पण...
इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमधील नवीन अभ्यासात आढळून आले की, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मातांच्या मुलांची बुद्धी ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मातांच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, या मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.
बुद्धिमत्तेचा वारसा केवळ ४० ते ६० टक्के
बुद्धिमत्तेपैकी केवळ ४० ते ६० टक्के वंशपरंपरागत असते. कौटुंबिक वातावरण, शाळा, आजूबाजूचे वातावरण, मित्रांच्या सवयी इत्यादींचा प्रभाव उर्वरित्त टक्क्यांत येतो, असे भारतासह आशिया, अमेरिका आणि युरोपमधील १८ वैज्ञानिक संशोधनांमध्ये म्हटले आहे.
आईवरचे प्रेम अवघड कामही सोपे करते
जी मुले त्यांच्या आईशी मनापासून जोडलेली होती त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जटिल खेळ खेळण्याची क्षमता विकसित केली. ते उद्दिष्टांप्रती वचनबद्ध राहिले आणि समस्या सोडवण्यात कमी निराश दिसले. तसेच मेंदूच्या काही भागांच्या विकासासाठी आईचे प्रेम महत्त्वाचे आहे, असे संशोधनात म्हटले.