अरे व्वा! एकाच वेळी महिलेने दिला तीन बाळांना जन्म; प्रसुती करणारे डॉक्टरही सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:19 PM2022-04-16T17:19:26+5:302022-04-16T17:34:02+5:30
नैना ८ महिने ३ आठवडे गर्भवती होती. तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुणा वर्मा या उपचार करत होत्या.
मेरठ – शहरातील एलएलआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दुर्गानगरमध्ये राहणाऱ्या महिलेने एकाचवेळी ३ सुदृढ मुलांना जन्म दिला आहे. ३ मुले आणि आईची तब्येत पूर्णपणे बरी असून या बातमीनं हॉस्पिटलच्या डॉक्टरांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. महिलेच्या कुटुंबानेही एकाचवेळी ३ मुले घरात आल्याने मोठा आनंद व्यक्त केला आहे.
मेडिकलचे कॉलेजचे माध्यम प्रमुख डॉ. वीडी पांडेय म्हणाले की, या महिलेचे नाव नैना असं असून पतीचं नाव रॉबिन सक्सेना असं आहे. नैना ८ महिने ३ आठवडे गर्भवती होती. तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुणा वर्मा या उपचार करत होत्या. डॉ. अरुणा आणि त्यांच्या टीममधील डॉ. राघवी, डॉ. प्रतिष्ठा यांनी हे ऑपरेशन यशस्वी करत ३ निरोगी मुलांची प्रसुती केली आहे. ३ मुलांमध्ये पहिल्या मुलाचे वजन २ किलोचं असून ते नैनाला सोपवण्यात आले आहे. तर दुसऱ्या मुलाचे वजन १.९ किलो. तिसऱ्या मुलीचं वजन १.५ किलो आहे. सध्या या दोघांना एनआयसीयूमध्ये ठेवले आहे. त्यांनाही लवकरच सोडलं जाईल असं त्यांनी सांगितले.
नैनाने सांगितले की, माझं कुटुंब एकाच वेळी पूर्ण झाले. ही माझी पहिली गर्भधारणा होती आणि आता मला तीन मुले आहेत. माझे पती एका खासगी कंपनीत काम करतात तर मी गृहिणी आहे. कुटुंबात इतर कोणालाही जुळी मुले नव्हती. दुसरीकडे, नैनाचा पती रॉबिन म्हणतो की, दोन मुले अजूनही एनआयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे थोडी काळजी वाटते असं सांगितले.
१ हजारांत केवळ एका महिलेलाच तिळी मुले
प्रसृती करणाऱ्या डॉ. अरुणा वर्मा यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच नैना यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अल्ट्रासाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त मुले असल्याचे समोर आले. सर्वसाधारणपणे, वैद्यकीय शास्त्रानुसार हजारातील एका महिलेला एकाच वेळी तीन मुले होऊ शकतात. आता हे आयव्हीएफद्वारे केले जाते, परंतु सामान्य प्रसूतीमध्ये हे दुर्मिळ आहे. एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देण्याच्या घटनेला वैद्यकीय भाषेत मल्टिपल प्रेग्नेंसी म्हणतात. याचा अर्थ स्त्रीच्या पोटात दोन किंवा अधिक मुले असतात.
जुळे दोन प्रकारचे असतात
जुळे किंवा तिळी असे दोन प्रकार आहेत, एकसारखे आणि वेगळे. वैद्यकीय भाषेत त्यांना मोनोजाइगोटिक आणि डायझिगोटिक म्हणतात. सामान्यतः, स्त्रीच्या शरीरात एक गर्भ पिशवी असते जी शुक्राणूंसोबत एकत्रित होऊन गर्भ (भ्रूण) तयार करते. पण अनेक वेळा या गर्भाधानात एक नव्हे तर दोन किंवा तीन भ्रूणही तयार होतात.