डोळ्यातील सूजेकडे दुर्लक्ष करणं महिलेला पडलं चांगलंच महागात; झाला गंभीर आजार अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:13 PM2023-08-12T15:13:54+5:302023-08-12T15:14:30+5:30
महिलेच्या उजव्या डोळ्याला सूज आली होती. बर्याच लोकांप्रमाणे ती देखील ही एक सामान्य समस्या मानत होती. तापामुळे डोळे सुजले आहेत असं तिला वाटलं. मात्र, जेव्हा तिला खरं कारण समजलं तेव्हा मोठा धक्का बसला.
सुजलेले डोळे हे कोणत्यातरी गंभीर आजाराचे लक्षण असू शकतं असं कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. सियारन मॉर्गन नावाच्या महिलेच्या उजव्या डोळ्याला सूज आली होती. बर्याच लोकांप्रमाणे ती देखील ही एक सामान्य समस्या मानत होती. तापामुळे डोळे सुजले आहेत असं तिला वाटलं. मात्र, जेव्हा तिला खरं कारण समजलं तेव्हा मोठा धक्का बसला.
सियारनचा उजवा डोळा खूप मोठा झाला होता. त्यातून पाणी येत होतं. जेव्हा सियारान तिच्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी ही समस्या तापाचाच परिणाम असल्याचे सांगितले. सियारनच्या मनात अजूनही शंका होती. शंका दूर करण्यासाठी ती एका ऑप्टिशियला भेटली. ऑप्टिशियनने देखील ही एक सामान्य समस्या असल्याचं सांगितलं. पण तरीही सियारानचं समाधान झाले नाही. कारण तिचा डोळा खूप सुजला होता आणि हाडं दुखणे, केस गळणं, त्वचेला खाज येणं, लक्ष न लागणं, घाम येणं आणि चिंता यांसारखी विचित्र लक्षणंही एकाच वेळी दिसू लागली.
10 तास चाललं ऑपरेशन
महिला पुन्हा डॉक्टरांना भेटली आणि तिने एमआरआय स्कॅन करून घेतले. एमआरआय स्कॅनचा निकाल समोर आला तेव्हा ती घाबरली. डॉक्टरांनी तिला सांगितले की टेनिस बॉलसारखा ट्यूमर हे तिच्या डोळ्याला सूज येण्यामागचं कारण आहे. ट्यूमरची बाब समोर आल्यानंतर सियारनचे ऑपरेशन 10 तास चालले. किंग्सब्रिज, डेव्हॉन येथील रहिवासी सियारन मॉर्गनने सांगितलं की, "मी डॉक्टरांना माझ्या प्रकृतीबद्दल सांगितलं. नंतर त्यांनी मला विचारले की माझ्या डोळ्याला काय झाले आहे. ट्यूमरबद्दल कळल्यावर मला खूप वाईट वाटलं आणि मी रडू लागले. मी माझ्या दोन्ही मुलांना हे कसं सांगू याबद्दल विचार करत होतो."
जीवघेणा होता ट्यूमर
सियारनच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितले की ट्य़ूमर डोळ्याच्या आत होता आणि ऑप्टिक मज्जातंतूला स्पर्श करत नव्हता, म्हणूनच त्याची दृष्टी अजूनही चांगली आहे. ट्यूमर सियारनच्या डोक्याच्या वरच्या भागातून आणि डोळ्याच्या खाली होता, म्हणजे तो कवटीत पसरत होता. ट्यूमर इतका जोखमीची होता की डॉक्टरांनी कवटीचं थ्रीडी मॉडेल बनवलं, जेणेकरून कोणतीही जोखीम न घेता तो कसा काढता येईल हे समजू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.