स्त्रियांनी आरोग्याकडे वेळीच द्या लक्ष, गायनॉकलॉजिस्टकडे जाणं टाळाल तर होतील गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:55 PM2021-12-14T17:55:56+5:302021-12-14T17:56:23+5:30

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानात लहान गोष्टींची काळजी स्त्रिया घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे (Female Health) सर्रासपणे दुर्लक्ष करतात. भारतामध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. आपल्या देशातील स्त्रिया आजही गायनॅकोलॉजिस्टकडं (Gynecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात.

woman should visit gynecologist to avoid below problems | स्त्रियांनी आरोग्याकडे वेळीच द्या लक्ष, गायनॉकलॉजिस्टकडे जाणं टाळाल तर होतील गंभीर परिणाम

स्त्रियांनी आरोग्याकडे वेळीच द्या लक्ष, गायनॉकलॉजिस्टकडे जाणं टाळाल तर होतील गंभीर परिणाम

googlenewsNext

कुटुंब व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी स्त्रिया पार पाडतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानात लहान गोष्टींची काळजी स्त्रिया घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे (Female Health) सर्रासपणे दुर्लक्ष करतात. भारतामध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. आपल्या देशातील स्त्रिया आजही गायनॅकोलॉजिस्टकडं (Gynecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात.

आपल्या आरोग्याचा अनेक अडचणी डॉक्टरांना सांगण्यात स्त्रियांना आजही संकोच वाटतो. अगदी सुशिक्षित महिलादेखील गायनॅककडं जाणं टाळतात. एखादी स्त्री धाडस करून डॉक्टरकडे जातेही पण तिथे गेल्यानंतर आपली नेमकी अडचण तिला सांगता येत नाही. डॉक्टरांकडं न जाणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, ही गोष्ट महिला गांभीर्यानं घेत नाहीत. मात्र, अशा महिलांच्या शारीरीक आरोग्याशी संबंधित अशा काही समस्या आहेत, ज्या दुर्लक्षामुळं वाढत जाऊन जीवघेण्याही ठरू शकतात. ‘हरजिंदगी’वेबसाइटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नोएडातील मदरहूड हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. तन्वीर औजला (Dr. Tanveer Aujla) यांनी स्त्रियांच्या काही मुलभूत समस्या सांगितल्या आहेत. या समस्या असलेल्या स्त्रियांनी त्या लपवून न ठेवता आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना मोकळेपणानं सांगितल्या पाहिजेत.

अनियमित पीरियड्स
अनेक स्त्रियांना वेळच्यावेळी मासिक पाळी येत नाही. त्यामध्ये अनियमितता असते. कॅलरीजचं कमी सेवन, आहारात जास्त प्रमाणात होणारे बदल, हॉर्मोनल चेंजेस या गोष्टी त्यासाठी कारणीभूत असू शकतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे किंवा एखाद्या प्रकारच्या आजारामुळेदेखील पीरियड्समध्ये अनियमतता (Irregular periods) येऊ शकते. एखादेवेळी पीरियड्स उशिरा किंवा लवकर येणं ठीक आहे. मात्र, जर असं वारंवार होत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडं गेलं पाहिजे.

पीरियड्समध्ये वेदना होणं
काही स्त्रिया आणि मुलींना पीरियड्समध्ये ओटीपोटात प्रचंड वेदना होतात. स्तनांना सूज येणं, स्तनांमध्ये वेदना होणं, पोटात दुखणं, उलटी होणं, मळमळ होणं अशा गोष्टींचा सामना पीरियड्समध्ये काहींना करावा लागतो. कधी-कधी या वेदनांमुळं चक्कर देखील येते. अशा स्त्रिया आणि मुलींनी गायनॅकोलॉजिस्टची भेट घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या पाहिजेत. कारण या समस्या फायब्रॉइड्स (Fibroids) किंवा एंडोमेट्रिओसिसची (Endometriosis) लक्षणं असू शकतात. विविध चाचण्या केल्यानंतर या समस्यांचं मूळ काय आहे? हे डॉक्टर सांगू शकतात.

व्हजायनाच्या आसपास बंप्स
व्हजायना म्हणजेच योनीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे अडथळे असल्यास किंवा अनावश्यक गोष्टी दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण योनीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे बदल झाले तर त्रास होऊ लागतो. काही वेळा व्हॅक्सिंगमुळेही त्रास होतो. मात्र, कधीकधी ही समस्या खूप मोठी असते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण, व्हजायनाच्या आसपास असलेल्या पुटकुळ्या या नागिण (Herpes), बार्थोलिन सिस्ट, त्वचेचे गळू इत्यादी आजारांची लक्षणं असू शकतात.

व्हजायनल ओडर (Vaginal odour)
व्हजायनल ओडर ही अतिशय सामन्य गोष्ट आहे. प्रत्येक स्त्री किंवा मुलीला कधीनाकधी ही समस्या जाणवते. ही गोष्ट डॉक्टरांना सांगण्यात अनेकजणी अवघडून जातात. मात्र, यावर उपचार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण, कधीकधी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं (Bacterial infection) योनीला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर हे इन्फेक्शन वाढूही शकतं

व्हजायनल इचिंग (Vaginal itching)
काहीवेळा योनीजवळ खाज सुटते. यामुळे खूप अस्वस्थ वाटू शकतं. सोबतच हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं. व्हजायनल इरिटेशन, संसर्ग, एसटीडीसारख्या समस्यांचं हे प्राथमिक लक्षण ठरू शकतं. काही वेळा व्हजायनल इचिंग ही कर्करोगाची (Cancer) सुरुवात देखील ठरू शकते. त्यामुळे या समस्येवर वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणं अतिशय आवश्यक आहेत.

व्हजायनल डिस्चार्ज
मानवी व्हजायना स्वतःच स्वच्छ होतो त्यामुळे अंतर्वस्त्रात काही प्रमाणात पांढरा स्राव येणं सामान्य आहे. परंतु, त्याचं प्रमाण जर जास्त असेल आणि त्यातून दुर्गंधी येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. जेव्हा तुमचे पिरीयड्स येणार असतील तेव्हाही व्हजायनातून होणारा व्हाईट डिस्चार्ज (White discharge) थोडा जास्त असू शकतो. पण, त्यासोबत जर जळजळ, वेदना, पुरळ, सूज, वास यासारख्या समस्यादेखील असतील तर त्यावर उपचार होणं गरजेचं आहे.

व्हजायनल ड्रायनेस
अनेक मुली आणि स्त्रिया व्हजायनल ड्रायनेसच्या (Vaginal dryness) म्हणजे योनी कोरडी पडणं या समस्येनं त्रस्त असतात. ड्रायनेसमुळं खाज सुटणं, जळजळ होणं, जखमा होणं यासारख्या समस्या सुरू होतात. काहीवेळा गर्भनिरोधक गोळ्या, शरीरातील इस्ट्रोजेनची कमतरता यामुळंही ड्रायनेसचा सामना करावा लागतो. ड्रायनेसची समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यावर उपचार घ्यावेत.

वरील सर्व समस्या स्त्री आणि मुलीला कधीनाकधी जाणवतातच. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. अतिशय साध्या वाटणाऱ्या या समस्या पुढे चालून मोठ्या आजारपणात रुपांतरित होऊ शकतात. यामुळेच मानसिक आरोग्य देखील बिघडतं. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या वैयक्तीक आरोग्याकडं खास लक्ष दिलं पाहिजे.

Web Title: woman should visit gynecologist to avoid below problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.