१०८च्या तत्परतेने वाचविला महिलेचा जीव
By admin | Published: November 27, 2015 09:33 PM2015-11-27T21:33:48+5:302015-11-27T21:33:48+5:30
बारामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला.
Next
ब रामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला. बारामती शहरातील रमेश कुंभार हे मंगळवारी आपल्या कुटुंबियांसह लातूरहून परतत होते. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा गणेश, महेश यांच्यासह त्यांची मोठी बहीण आशा कुंभार, सुरेखा चौगुले हे होते. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान कुर्डुवाडी येथे आशा यांना अचानक श्वास घेताना धाप लागू लागली. याच दरम्यान, टेंभुर्णी ते इंदापूर दरम्यान अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या वेळी सुरेखा चौगुले यांनी शासकीय रुग्णवाहिका सेवेसाठी १०८ क्रमांकाला संपर्क साधला. तात्काळ सोलापूरमधून शासकीय रुग्णवाहिका निघाली. ही रुग्णवाहिकादेखील वाहतुकीच्या कोंडीत अडकली. मात्र, या रुग्णवाहिकेतील कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखून इंदापूरच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून १०८ क्रमांक सेवेअंतर्गत असणारी अन्य रुग्णवाहिका पाठवून दिली.टेंभुर्णी आणि इंदापूर परिसरातील टोलनाक्याजवळ रुग्णवाहिका कुंभार कुटुंबीयांजवळ पोहोचली. तातडीने रुग्णवाहिकेतील डॉ. रवींद्र खटके यांनी अत्यवस्थ झालेल्या कुंभार यांच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णवाहिका तातडीने बारामती शहरातील गिरीराज रुग्णालयाच्या दिशेने आणण्यात आली. या तातडीच्या उपचारांमुळे आशा यांचे प्राण वाचू शकले.