बाळंतपणानंतर स्त्रिया होतात ‘म्हाताऱ्या’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 08:01 AM2021-06-23T08:01:52+5:302021-06-23T08:02:10+5:30

बाळाला वाढवायचं असतं. ज्यांनी अगोदरच हा ‘अभ्यास’ केलेला असतो.

Women become 'old women' after childbirth? | बाळंतपणानंतर स्त्रिया होतात ‘म्हाताऱ्या’?

बाळंतपणानंतर स्त्रिया होतात ‘म्हाताऱ्या’?

Next

कोणत्याही घरात मूल जन्माला येणं ही आत्यंतिक आनंदाची गोष्ट. त्यातही एखाद्या कुटुंबातलं हे पहिलंच मूल असेल किंवा एखाद्या कुटुंबात दीर्घ काळानंतर मूल जन्माला आलं असेल तर त्या कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाही. नव्यानंच माता झालेल्या पहिलटकरणीसाठी तर तिच्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. पण, तो खरंच तसा असतो? विशेषत: महिलांच्या बाबतीत? लग्न झाल्यावर पहिल्यांदा तिच्यावरच्या जबाबदाऱ्या बदलतात, मूल झाल्यावर तर सगळ्याच आघाड्यांवर तिला लढावं लागतं. त्यातही बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंतचा काळ हा बाळासाठी आणि मातेसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मातेमध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात. त्यांच्याशी जुळवून घेता घेता तिची त्रेधातिरपीट उडते. त्यात अचानक नव्या जबाबदाऱ्या आ वासून पुढे ठाकतात. आतापर्यंतचं सगळं रुटिनच बदलून जातं आणि सर्वार्थानं एका नव्या विश्वात ती प्रवेश करते.

सर्वच दृष्टीनं हा कठीण काळ असतो. अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतात. बाळाला वाढवायचं असतं. ज्यांनी अगोदरच हा ‘अभ्यास’ केलेला असतो, त्यांच्या दृष्टीनं हा काळ त्यातल्या त्यात सुसह्य ठरतो; पण प्रत्येकच स्त्रीसाठी मूल झाल्यानंतरचा काळ अतिशय आव्हानात्मक असतो. कारण सगळीच नवी आव्हानं पुढ्यात येऊन पडलेली असतात. मूल झाल्यानंतर पहिले सहा महिने, वर्षभर त्या मातेला किती त्रास सहन करावा लागतो आणि किती नवनव्या गोष्टी तिला शिकून घ्याव्या लागतात, हे तिचं तिलाच माहीत! 

मूल होणं, आई होणं ही खरंच अत्यानंदाची गोष्ट असली, जवळपास प्रत्येक महिलेचं ते स्वप्न असलं, तरी त्यासाठी किती दिव्यातून तिला जावं लागतं, याची इतरांना कल्पना येत नाही. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनानं या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आहे.  अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यांच्या मते प्रत्येक मातेसाठी बाळाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कारण याच काळात बाळाची खूप काळजी घ्यावी लागते. मातेलाही खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंत जवळपास सर्वच सवयी बदलाव्या लागतात. त्यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावं लागतं. त्यासाठी कष्ट तर पडतातच, पण अनेक मातांची झोपच पूर्ण होत नाही. शास्त्रज्ञांच्या मते हा काळ कितीही आनंदाचा असला, तरी बाळाचं संगोपन आणि इतर सगळ्या आघाड्यांवर लढताना त्या मातेचं वय पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल तीन ते सात वर्षांनी वाढलेलं दिसायला लागतं. थोडक्यात ती महिला आपल्या वयापेक्षा बरीच ‘वृद्ध’ दिसू लागते.

या अभ्यासगटातील एक प्रमुख संशोधक डॉ. जुडिथ कॅरॉल यांचं म्हणणं आहे, केवळ बाळाच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला तरी वेळी-अवेळी, मध्यरात्री बाळाला स्तनपान करणं, त्याची नॅपी बदलणं, त्याच्याकडे लक्ष देणं, ते रडत असेल तर त्याला गप्प करणं, आजारी असेल तर औषध देणं, त्याची देखभाल करणं.. या साऱ्या गोष्टींत आईची अर्धी शक्ती खर्च होते. त्यात बाळ जर रात्री जागणारं आणि रडकं असेल तर मग तिच्यापुढचं आव्हान अधिकच खडतर बनतं.

तिची झोपच पूर्ण होत नाही. त्याचा बहुसंख्य मातांच्या शरीर-मनावर विपरीत परिणाम होतो. नुकतंच मूल झालेल्या अनेक महिलांचा त्यांनी अभ्यास केला, त्यातल्या जवळपास प्रत्येक स्त्रीनं ‘माझी झोप पूर्ण होत नाही,’ हेच गाऱ्हाणं सांगितलं. कष्ट आणि जागरणं, यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळं पडण्यापासून तर त्यांच्या चेहऱ्याची रया जाण्यापर्यंत अनेक गोष्टी होतात. त्यामुळेच आपल्या वयापेक्षा त्या अधिक थोराड दिसायला लागतात. त्याची खातरजमा करण्यासाठी या महिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचीही तपासणी करण्यात आली. त्यातूनही या महिलांचं वय ‘वेगानं’ वाढत असल्याचं सिद्ध झालं. 

या समस्येवर मात करण्याचा उपायही डॉ. कॅरॉल सांगतात. त्यांचं म्हणणं आहे, मातांनी यासाठी कुटुंबात, घरात जी कोणी व्यक्ती असेल, त्या प्रत्येकाची मदत घेतली पाहिजे. बाळाच्या वडिलांपासून ते  आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांची मदत बाळाच्या संगोपनासाठी घ्यावी. शिवाय सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा संधी मिळेल, त्या प्रत्येक वेळी किमान एखादी डुलकी तरी नक्कीच मारली पाहिजे. 
आधीच प्रसूतीमुळे शरीराची झालेली झीज, त्यात कष्ट, जागरणं यामुळे इतर अनेक आजारांनाही या मातांना सामोरं जावं लागतं. 

स्त्रिया पुन्हा ‘तरुण’ होतात? 

डाॅ. कॅरॉल यांचं म्हणणं आहे, बाळंतपणानंतर पहिल्या सहा महिन्यांतच स्त्रिया पाच-सात वर्षांनी अकाली प्रौढ दिसायला लागत असल्या तरी हा परिणाम दीर्घ काळ टिकून राहतो का, याविषयी आणखी सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतर या महिलांचं ‘तारुण्य’ परत येतं का, शरीर ही झीज भरून काढतं का, त्यासाठी किती काळ लागतो, यासाठी व्यापक संशोधन करावं लागणार आहे.

Web Title: Women become 'old women' after childbirth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.