महिलांनो, वजन ठेवा आटोक्यात. शास्त्रज्ञांचा सल्ला
By admin | Published: May 22, 2017 03:51 PM2017-05-22T15:51:14+5:302017-05-22T15:51:14+5:30
सावधान. विशीनंतर वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा अधिक वजन वाढत असेल, तर आजारांनी व्हाल त्रस्त
Next
- मयूर पठाडे
आरोग्याचं एक सर्वसाधारण सूत्र आहे. विविध प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला वचायचं असेल तर आधी तुमचं वजन आटोक्यात ठेवा. कारण बरचसे आजार आपल्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतात. त्याचं पहिलं प्रतिबिंब पडतं ते आपल्या वजनात. त्यामुळे त्या त्या रोगांशी लढताना आणि त्यांना प्रतिबंध घालतानाही तुम्हाला पहिल्यांदा दोन हात करावे लागतात, ते या वाढत्या आणि वाढलेल्या वजनाशीच.
नुकत्याच झालेल्या संशोधनानं तर शास्त्रज्ञांनी सर्वांना; विशेषत: महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तुमच्या विशीत असतानाच तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण जर सुटलं तर त्यावर कंट्रोल ठेवणं नंतर अवघड जातं आणि भविष्यात तुम्हाला लठ्ठपणालाही सामोरं जावं लागू शकतं.
त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विशीतील आणि तिशीतील महिलांचा अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष आणखी सोपा करून सांगताना या संशोधकांनी सरळ एक आराखडाच तयार केला.
वयाच्या विशीत असताना तुमचं वजन फार वाढू देऊ नका. समजा वयाच्या विशीत तुमचह वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्ही चांगले लठ्ठ झालेले असाल आणि आरोग्याच्या संदर्भातील अनेक व्याधींनी तुम्हाला घेरलेलंही असेल.
वजन वर्षाला पाऊणेदोन किलो, म्हणजे काही फार नाही, महिन्याला छटाक दोन छटाक वजन वाढलं तर असं काय मोठं बिघडलं, असं कुणाला वाटू शकेल, पण त्यामुळे भविष्यात त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना समाोरं जावं लागू शकतं.
त्यामुळे शास्त्रज्ञांनी महिलांना करायला अगदी सो असा सल्ला दिला आहे. वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका.
वजन वाढल्यानं काय होतं?
वजन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतं. वाढतं वजन एकाचवेळी दोन मोठय़ा समस्यांना साोबत घेऊन येतं, ते म्हणजे लठ्ठपणा आणि डायबेटिस. एकदा हे दोघं आले की मग इतर आजारांनाही ते घरोबा करून देतात.
विशषत: लाइफस्टाइलमुळे हे आजार होतात, पण या आजारांमुळे पुन्हा आपोआप तुमची लाइफस्टाइल बदलते, असं हे दुहेरी दुष्टचक्र आहे.
शिवाय वाढत्या वजनामुळे होणारं मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं आहे.
का वाढतं वजन?
वजन वाढीची अनेक कारणं आहेत. त्यात धुम्रपान हे एक. पण विशेषत: महिलांमध्ये वजनवाढीचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण. त्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय वैवाहिक समस्या, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, सांसारिक टेन्शन्स. यामळे महिलांचं वजन वाढू शकतं. रजोनिवृत्तीनंतरच्या काळात त्यामुळे छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.