औषध महिलांचे, वय कमी होते पुरुषांचे! इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी शोधले नेमके कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 09:26 AM2023-10-01T09:26:02+5:302023-10-01T09:26:15+5:30
या औषधांचा लाभ पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
लंडन : हळूहळू वय वाढत जाणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येत जाणे, वार्धक्याच्या खुणा ठळक होत जाणे हे कुणालाही आवडत नसते. त्यामुळे महिला असो वा पुरुष, अँटी एजिंग औषधे घेत असतात. यासाठी कंपन्यांनीही बाजारात विविध प्रकारच्या गोळ्या-औषधे आणलेली आहेत. या महागड्या औषधांचा खपही जोरदार होतो. परंतु, या औषधांचा लाभ पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
लंडनच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजी ऑफ एजिंगच्या वैज्ञानिकांच्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
कसे केले संशोधन?
संशोधकांनी सांगितले की, अँटी एजिंग औषधे पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक प्रभावी ठरतात असे दिसून आले आहे. या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी नर आणि मादी माशांची निवड केली.
या माशांवर अँटी एजिंग औषधांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. हा अभ्यास ‘नेचर एजिंग’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यानुसार, ही औषधे केवळ मादी माशांचा जीवनकाळ वाढवतात. नर माशांचा जीवनकाळ मात्र यामुळे वाढत नाही. सर्वांत प्रभावी अँटी एजिंग औषध रॅपामायसिन फक्त मादी माशांच्या पोटात वाढत्या वयामुळे विकसित होणाऱ्या आजारांचा प्रभाव कमी करते.
दुष्परिणामांची भीती
अहवालाचे प्रमुख लेखक यू-जुआन लू यांनी सांगितले की, अँटी एजिंग औषधांच्या प्रभाव लैंगिक फरकाप्रमाणे वेगवेगळा असतो.
यामुळे महिलांचे वय वाढत असते. अशी औषधे खाल्ल्याने महिलांना मोठ्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते हेही तितकेच खरे आहे.
पुरुषांना का फायदा होत नाही?
अँटी एजिंग औषध रॅपामायसिन खाल्ल्याने महिलांच्या आतड्यातील पेशींच्या अनावश्यक पदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या क्षमतेत (ऑटोफॅगी) मोठी वाढ झाली. यामुळे त्यांचे आयुष्य वाढते. परंतु, पुरुषांच्या आतड्यांच्या पेशींची क्षमता मात्र या औषधांमुळे वाढत नसल्याचे दिसून आले.