बापरे! कामाचं प्रेशर आणि पैशांची चिंता ठरतेय हार्ट अटॅक, स्ट्रोकचं कारण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:16 AM2021-12-22T10:16:52+5:302021-12-22T10:24:11+5:30
Health News : कामाच्या ठिकाणचा तणाव (Work Place Pressure) आणि पैशाची चिंता (Money Worries) आरोग्यावर परिणाम करते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ताण-तणावाचा सामना करत आहे. काहींवर घरच्या जबाबदाऱ्यांचं दडपण असतं, तर काहींवर ऑफिस किंवा व्यवसायामध्ये प्रेशर असतं. हा दबाव किंवा प्रेशर कशाचेही असो शेवटी आरोग्यास ते घातक असतं. जास्त टेन्शन घेतल्याने एखादी व्यक्ती तणावग्रस्त देखील होऊ शकते. स्वीडनच्या गोथेनबर्ग विद्यापीठाने (University of Gothenburg) केलेल्या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणचा तणाव (Work Place Pressure) आणि पैशाची चिंता (Money Worries) आरोग्यावर परिणाम करते.
स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका यामुळे सुमारे 30 टक्क्यांनी वाढतो. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या रिसर्चमध्ये अनेक देशांतील एक लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. मानसिक तणावामुळे शरीरातील कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, असे समोर आले. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढतो. या रिसर्चमध्ये 30 ते 70 वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. वाढत्या वयासोबत मानसिक ताण-तणावही वाढत असल्याचं समोर आलं आहे.
रिसर्च लीड करणाऱ्या डॉ. एनिका रोसेगेन (Annika Rosengren) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या ठिकाणचं प्रेशर आणि पैशाची चिंता यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (Cardiovascular diseases) आणि रक्त गोठण्याचा धोकाही (Blood clotting) वाढतो. तसेच तीव्र तणावग्रस्त लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका नेमका कशामुळे होतो, हे माहीत नाही. 'पण शरीरात एथेरोस्क्लेरोसिससारख्या अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया असतात आणि तणावामुळे रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो असं देखील रोसेगेन यांनी म्हटलं आहे.
आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल, तर आपल्याला तणाव हा आणखी एक बदलता येण्याजोगा जोखीम घटक मानला पाहिजे. रिसर्चनुसार, हृदयरोगामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 18 कोटी लोकांचा मृत्यू होतो. हृदयविकार हे जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनत आहे. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैली. वयाच्या 40 वर्षांनंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केलाच पाहिजे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.