World Asthma Day 2018 : काय आहेत अस्थमा आजाराची लक्षणे, कशामुळे होतो अस्थमा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 12:36 PM2018-05-01T12:36:10+5:302018-05-01T12:36:10+5:30
या आजाराच्या रुग्णांना एकीकडे श्वास घेण्यास त्रास होतो तर दुसरीकडे त्यांना श्वास थांबण्याचाही त्रास होतो. चला जाणून घेऊया अस्थमा किंवा दम्याची लक्षणे आणि त्याचा धोका...
अस्थमा किंवा दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. या आजाराने श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात श्वासनलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो. या त्रासामुळे रुग्णांना लहान श्वास घ्यावा लागतो. कारण छातीत एकप्रकारचा तणाव निर्माण होत असतो. श्वास भरून येतो आणि त्यामुळे जोरदार खोकलाही येतो. अॅलर्जीमुळे छातीत कफ तयार होतो. या आजाराच्या रुग्णांना एकीकडे श्वास घेण्यास त्रास होतो तर दुसरीकडे त्यांना श्वास थांबण्याचाही त्रास होतो. चला जाणून घेऊया अस्थमा किंवा दम्याची लक्षणे आणि त्याचा धोका...
उन्हाळ्यातही असतो अस्थम्याचा त्रास
उन्हाळ्याच्या दिवसात अस्थमा कमी आढळतो किंवा त्याचा त्रास कमी होतो, त्यामुळे अनेकजण अस्थमाबाबत निष्काळजी होतात. पण असे नाहीये की, उन्हाळ्यात अस्थम्याचा त्रास होत नाही. गरमीच्या दिवसात अस्थम्याचे रुग्ण हे औषधं घेण्यास आणि काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे या दिवसातही अस्थम्याचा अटॅक येऊ शकतो. उन्हाळ्यात अस्थमा येण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
अस्थमा अटॅकची कारणे
- धूळ आणि वायु प्रदुषण
- सर्दीची समस्या
- वातावरणातील बदल
- इन्फेक्शन
- थंड पदार्थांचे सेवन
- अॅलर्जी
- जेनेटिक कारण
- मानसिक तणाव
- स्मोकिंग
- अल्कोहल
अस्थम्याची कारणे
अस्थमा नियंत्रित करता येतो. अस्थमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी. मुलांना होणाऱ्या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.
इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो. वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.
अस्थमा होण्याची लक्षणे
श्वास घेण्यास त्रास होणे हे अस्थमाचे पहिले लक्षण आहे. अस्थमा हा आजार एकतर अचानक होतो नाहीतर खोकला, सर्दी या अॅलर्जीच्या लक्षणांनी सुरु होतो. अस्थमाची लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील. ही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.
- श्वास घेण्यास त्रास होणे
- छातीत तणाव निर्माण होणे
- श्वास घेतांना घाबरल्यासारखं होणे
- श्वास घेताना घाम सुटणे
- अस्वस्थता जाणवणे
अस्थमा रुग्णांनी या गोष्टींची घ्या काळजी
- नेहमी सोबत इनहेलर ठेवा
- घर नेहमी स्वच्छ ठेवा
- धूळ-मातीपासून दू रहा
- व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा
- तोंडाने श्वास घेऊ नये
अस्थम्याचा अटॅक आल्यावर का करावे?
- सरळ ताठ उभे राहा, झोपून राहू नका
- मोठा श्वास घ्या
- डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्या
- सैल कपडे घाला