कॅन्सरची ७ सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:34 IST2025-02-04T11:32:46+5:302025-02-04T11:34:14+5:30

World Cancer Day 2025 : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात. अशात कॅन्सर जर झाला असेल तर शरीरात काही सुरूवातीची लक्षणं दिसतात.

World Cancer Day 2025 : 7 Early Warning Signs of Cancer You Shouldn’t Ignore | कॅन्सरची ७ सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

कॅन्सरची ७ सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

(डॉ वैभव चौधरी, कन्सल्टन्ट, मेडिकल ऑन्कोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

World Cancer Day 2025 : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात. अशात कॅन्सर जर झाला असेल तर शरीरात काही सुरूवातीची लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. अशात ही लक्षणं कोणती असतात हे जाणून घेऊया.

१. सूज

शरीराच्या कोणत्याही भागाला आलेली सूज, जिचा आकार वाढत आहे. 
शरीराच्या कोणत्याही भागावर हळूहळू वाढणारी कोणतीही गाठ, सूज किंवा वाढ याकडे दुर्लक्ष करू नये. सुरुवातीला ते कदाचित ते दुखणार नाही, पण नंतर वेदनादायक असू शकते. अशी सतत सूज येत असल्यास, डॉक्टरांना दाखवावे.

२. न बरे होणारे व्रण किंवा जखमा

जर शरीराच्या कोणत्याही भागावर जखम किंवा व्रण असेल आणि ते योग्य वेळेत बरे होत नसेल, तर ते धोक्याचे कारण असू शकते. सामान्यतः जखमा काही काळानंतर बऱ्या होऊ लागतात. पण जर जखम उघडी राहिली,चिघळली किंवा त्यामध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही तर डॉक्टरांना दाखवावे. हा एखादा गंभीर आजार किंवा कॅन्सर देखील असू शकतो.

३. ज्याचे स्पष्ट कारण समजून येत नाही असा, शरीराच्या कोणत्याही भागातून होणारा रक्तस्त्राव

कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शरीराच्या एखाद्या भागातून रक्तस्त्राव होत असल्यास किंवा खोकल्यातून, मल, लघवीमधून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. एखादी दुखापत झाली आणि त्यातून रक्त येणे सामान्य आहे पण शरीरातून कोणत्याही कारणाशिवाय आपोआप रक्तस्त्राव होत नाही, अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

४. स्तनाग्रामध्ये बदल किंवा कोणताही असामान्य स्त्राव

स्तनाग्रामध्ये कोणताही बदल, जळजळ, स्तनाग्र उलटे होणे, त्याच्या आकारात बदल किंवा स्तनाग्रातून कोणताही असामान्य स्त्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. असे बदल स्तनाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असतात आणि म्हणूनच शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना दाखवावे.

५. सततचा खोकला किंवा इतर काहीही स्पष्ट कारण नसताना आवाजामध्ये कर्कशपणा येणे 

खोकला बरेच दिवस येत असेल आणि आवाजामध्ये कर्कशपणा येत असेल तर तपासणी करून घेतली पाहिजे. कोणताही संसर्ग किंवा इतर समजून येण्यायोग्य कारण नसेल, तर सतत खोकला येणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे किंवा फुफ्फुसाच्या आजारासारख्या इतर गंभीर श्वसन विकारांचे लक्षण असू शकते.

६. शौचाच्या सवयींमध्ये बदल किंवा काहीही स्पष्ट कारण नसताना बद्धकोष्ठता

शौचाच्या सवयींमध्ये सतत बदल होत असल्यास, विशेषतः ६० ते ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता, अतिसार किंवा मलाच्या टेक्श्चरमध्ये बदल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. बऱ्याचदा, वाढत्या वयामध्ये बद्धकोष्ठतेला वृद्धत्वाची सामान्य समस्या मानून दुर्लक्षिले जाते. परंतु आजवर कधीही अशा समस्या आल्या नाहीत अशा व्यक्तीला अचानक सतत बद्धकोष्ठता होत असेल तर ते कोलोरेक्टल कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. कोलोरेक्टल कॅन्सरमुळे हळूहळू रक्त कमी होत जाते आणि ते लक्षात येत नाही परंतु त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि कालांतराने होणारी इतर लक्षणे जाणवू लागतात.

७. सतत पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट भरल्याची भावना होणे 

सतत पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट भरल्याची भावना याला वजन वाढले आहे असे वाटून दुर्लक्ष करू नये. बरेच लोक असे गृहीत धरतात की त्यांचे पोट वाढत आहे किंवा शरीरातील चरबी वाढत आहे. पण आहार किंवा जीवनशैलीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल न करताही पोट फुगणे कायम राहिल्यास, ते गर्भाशयाच्या कॅन्सरचे किंवा इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या काळात किंवा ज्यांना पचनक्रियेत त्रास होत आहे अशांसाठी हे चिंताजनक आहे.

योनीमधून स्त्राव किंवा रक्तस्त्राव होत असेल, खासकरून रजोनिवृत्तीनंतर हे होत असल्यास, तातडीने फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळून येणारा एक मोठा आजार आहे.

काही लक्षणे खूप महत्त्वाची असतात कारण ती वेळीच ओळखली गेल्यास कॅन्सर खूप आधीच्या टप्प्यात लक्षात येऊ शकतो. म्हणूनच यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने वैद्यकीय मदत घ्या. आजाराचे निदान लवकरात लवकर झाल्यास यशस्वी उपचारांची शक्यता खूप जास्त वाढते. खासकरून, जेव्हा कॅन्सरचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये होते तेव्हा तो बरा होण्याची, रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते.

Web Title: World Cancer Day 2025 : 7 Early Warning Signs of Cancer You Shouldn’t Ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.