World Diabetes Day : सडपातळ आदिवासींमध्येही वाढतोय मधुमेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:18 AM2018-11-14T08:18:19+5:302018-11-14T08:20:05+5:30

मधुमेह हा रोग केवळ उच्चभ्रू आणि लठ्ठ असणाऱ्यांनाच होतो, हा समज आता खोटा ठरत असून, सडपातळ असणाऱ्या आदिवासींमध्येही मधुमेह वाढत असल्याचे दिसून आले आहे.

World Diabetes Day: Increasing diabetes among slim tribals also | World Diabetes Day : सडपातळ आदिवासींमध्येही वाढतोय मधुमेह

World Diabetes Day : सडपातळ आदिवासींमध्येही वाढतोय मधुमेह

googlenewsNext
ठळक मुद्देजीवनशैलीचा परिणाम : लठ्ठ किंवा श्रीमंत असणाऱ्यांचा हा रोग गरिबांनाही  

श्रीकिशन काळे 

पुणे : मधुमेह हा रोग केवळ उच्चभ्रू आणि लठ्ठ असणाऱ्यांनाच होतो, हा समज आता खोटा ठरत असून, सडपातळ असणाऱ्या आदिवासींमध्येही मधुमेह वाढत असल्याचे दिसून आले आहे. आदिवासी लोकांची बदललेली जीवनशैली त्याला कारणीभूत असल्याचे डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया, पुणे शाखेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आदिवासींमध्ये १० टक्के मधुमेही लोकांचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे. 

           डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया, पुणे शाखेतर्फे छत्तीसगड येथील बस्तर परिसरात आदिवासींची आरोग्य तपासणी करण्यात आली. खास करून त्यांच्यातील मधुमेहाचे प्रमाण तपासण्यासाठी ही तपासणी होती. यामध्ये डॉ. रमेश गोडबोले, डॉ. मुकुंद कन्नूर, डॉ. बाला कुलकर्णी, अनिल कुलकर्णी व नीळकंठ खंडकर यांचा समावेश होता. त्यांनी आदिवासींची प्राथमिक तपासणी केली. 

            सर्वसाधारणपणे मधुमेह, हायब्लड प्रेशर, हृदयविकार या प्रकारचे रोग बैठे काम करणारे, श्रीमंत व पन्नाशीच्या पुढच्या वयाच्या लोकांना होतात असा समज होता. तो आता खोटा ठरत आहे. खेड्यातील किंवा आदिवासी लोकांची जीवनशैली शहरातील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात वरील रोग होतील, याबाबत शंका नव्हती. परंतु, आता झोपडपट्टी आणि आदिवासींमध्येही हे रोग दिसून येत आहे. कारण, त्यांची बदललेली जीवनशैली. छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर या गावाजवळील आदिवासी वस्त्यांमध्ये सुमारे ३०० प्रौढ स्त्री-पुरुषांच्या रक्तातील रॅँडम साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंची, डोळे अशी तपासणी केली. त्यांचे खाणे-पिणे, राहणे, दैनंदिन व्यवहार, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचाही मागोवा घेतला. या पाहणीत आदिवासींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे जाणवले. आदिवासींमधील या रोगाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले. 

 १० टक्के जणांना मधुमेह 

आदिवासींच्या निरीक्षणावरून मधुमेहींच्या पूर्वावस्थेत सुमारे ६ टक्केआणि मधुमेहग्रस्त ४ टक्केआदिवासी आढळून आले. हे प्रमाण शहरातील मधुमेहींच्या टक्केवारीपेक्षा फारसे कमी नाही. शिवाय, मधुमेही आदिवासी बहुतेक मध्यमवयीन आहेत. तसेच, मधुमेही लठ्ठदेखील नाहीत. त्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) वाढलेला नाही. त्यांच्यातील काहींना आपल्याला मधुमेह झाला असल्याचे माहीत होते. परंतु, ते योग्य उपचार घेत नाहीत. फक्त जडीबुटीची औषधे काही जण घेत आहेत. या पाहणीत हाय ब्लड प्रेशर असलेल्या आदिवासींचे प्रमाणही बरेच आढळले. 

मधुमेहाची संभाव्य कारणे :

आदिवासी भागात खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतके धान्य सरकारकडून घरापर्यंत कमी दरात मिळते. त्यामुळे पुरेसे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, स्निग्ध पदार्थ मिळत आहेत. पूर्वी हे मिळत नव्हते; तसेच आता शेतीमालाला हमीभाव दिला जातो. त्यामुळे येथील आदिवासींना पूर्वी इतके शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. दळणवळणाची सोय झाली असल्याने चालणे कमी झाले. गॅस घरात आल्याने दूरवर लाकडे गोळा करण्यासाठी जाण्याची गरज नाही. त्यांच्या भागात नक्षलवादी चळवळ पसरलेली आहे. त्यामुळे त्याचे दडपण त्यांच्यावर असते. परिणामी, ते मानसिक तणावाखाली असतात. त्यांना पूर्वी दूरवरून पाणी आणावे लागत असे. आता त्यांच्या घराशेजारीच बोअर तयार केलेले आहेत. तसेच दारू, तंबाखूचे सेवन अनेकजण करीत आहेत. ही कारणे मधुमेहाला पूरक आहेत. 

दोन वर्षांपूर्वी १ किंवा २ टक्के प्रमाण 

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील  भामरागड, हेमलकसा परिसरात आदिवासींची आरोग्य तपासणी केली होती. त्यामध्ये १ किंवा २ टक्केच मधुमेहाचे प्रमाण आढळून आले होते. परंतु, त्यानंतर आता हे प्रमाण चिंताजनक आहे. 

Web Title: World Diabetes Day: Increasing diabetes among slim tribals also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.