World Health Day 2023: उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:02 AM2023-04-06T11:02:44+5:302023-04-06T11:02:53+5:30
Foods To Avoid in Summer Season : या दिवसांमध्ये लोकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच ऊसाचा रस, नारळाचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. अशात या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आरोग्याला नुकसानकारक ठरतात हे जाणून घेऊ.
Foods To Avoid in Summer Season : उन्हाळ्यात खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दिवसात योग्य आहार घेतला नाही तर तुम्ही आजारी पडू शकता. चुकीचा आहार घेतल्याने पोट खराब होतं. फूड पॉयजनिंग, पोटदुखी, उलटी इत्यादी समस्या होऊ शकतात. या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी थंड पदार्थ-पेयांचं सेवन अधिक केलं पाहिजे. जेणेकरून शरीर आतून थंड रहावं. या दिवसांमध्ये लोकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच ऊसाचा रस, नारळाचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. अशात या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आरोग्याला नुकसानकारक ठरतात हे जाणून घेऊ.
मसालेदार-तिखट पदार्थ - उन्हाळ्याच्या दिवसात जेवणात तिखट आणि मसाले कमी टाकले पाहिजे. तसेच जास्त तेलाचाही वापर करू नये. तसेच काही कोरड्या मसाल्यांचा वापर टाळावा. दालचीनी, गरम मसाला जास्त वापरू नये. याने शरीराचं तापमान वाढतं आणि पचनालाही समस्या होते. काही मसाल्यांमध्ये कॅपसेसिन नावाचं तत्व असतं. ज्याने शरीरात पित्त दोष वाढतो आणि याने शरीराची उष्णता वाढते. याने तुम्हाला घाम येणे, त्वचेवर पुरळ येणे, कमजोरी, डिहायड्रेशन इत्यादी समस्या होतात.
नॉनव्हेज खाणं कमी करा - जे लोक नेहमीच अधिक नॉनव्हेज खातात त्यांनी या दिवसात ते खाणं कमी केलं पाहिजे. तंदुरी चिकन, मासे, सीफूड अधिक खाणं टाळलं पाहिजे. कारण या दिवसात याने तुम्हाला अधिक घाम येऊ शकतो. सोबतच पचनासंबंधी समस्याही होतात. अनेकदा मांस-मच्छीचं अधिक सेवन केलं तर जुलाबही लागू शकतात.
जंक फूड टाळा - आजकालची तरूणाई आणि लहान मुलं पिझ्झा, बर्गर, चायनीज, मोमोज, समोसा, फ्रेंच फ्राइज इत्यादी पदार्थ अधिक खातात. पण उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेलकट किंवा जंक फूड किंवा फास्ट फूड खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. तसेच तेल-मसाल्यामुळे उन्हाळ्यात शरीराचं देखील तापमान अधिक वाढतं.
लोणचं कमी खा - बऱ्याच लोकांना लोणचं खाणं आवडतं. जेवणासोबत जास्तीत जास्त लोक लोणचे खातात. याने टेस्ट चांगली होते. पण टेस्टच्या नादात तुमचं आरोग्य बिघडू शकतं. लोणच्यामध्ये तेल-मसाले अधिक असतात आणि ते फर्मेंटेड असतं. यात सोडियमचं ही प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे वॉटर रिटेंशन, सूज, अपचन, ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.