World Health Day: मानसिक आरोग्यावरील काजळी कायम, वर्षभरात पाच लाखांहून अधिकांनी घेतले उपचार

By स्नेहा मोरे | Published: April 7, 2023 07:14 AM2023-04-07T07:14:31+5:302023-04-07T07:15:13+5:30

आज जागतिक आरोग्य दिन, ग्रामीण भागातही मानसिक समस्या

World Health Day: The grime on mental health continues, more than five lakh people have received treatment in a year | World Health Day: मानसिक आरोग्यावरील काजळी कायम, वर्षभरात पाच लाखांहून अधिकांनी घेतले उपचार

World Health Day: मानसिक आरोग्यावरील काजळी कायम, वर्षभरात पाच लाखांहून अधिकांनी घेतले उपचार

googlenewsNext

स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोनानंतर आरोग्यसेवेत अधोरेखित झालेले मानसिक आरोग्याचे महत्त्व आता दिवसागणिक अधिक गडद होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर राज्यभरात गेल्या वर्षभरात पाच लाखांहून अधिक मनोरुग्णांवर उपचार केले आहेत, तर नवीन वर्षात १ लाख १३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.

राज्यातील चार मानसोपचार रुग्णालयात गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात ५ लाख ८१ हजार रुग्णांनी उपचार घेतले तर रुग्णालयात दाखल होऊन १९ हजार १६० रुग्णांवर उपचार केले आहेत.  तर चालू वर्षात जानेवारी ते मार्च या काळात १ लाख १३ हजार रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागांत, तर ४ हजार ४८२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सध्या चारही रुग्णालयांमध्ये २ हजार ७६४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मानसिक आजारांमध्ये अतिनैराशेचे प्रमाण सर्वात जास्त असते. यात युनिपोलर म्हणजे फक्त नैराशाची लक्षणे असणारा आणि दुसरा बायपोलर म्हणजे नैराश्य आणि अतीव आनंदाची लक्षणे असणारा आजारांचा समावेश आहे. या दोन आजारांत बायपोलरमध्ये जनुकीय बदल जास्त प्रमाणात आढळतो. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आनुवंशिकतेचा जास्त वाटा असतो, अशी माहिती मानसिक आरोग्य सहसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातही मानसिक समस्या

ग्रामीण भागातील महिलांच्या मानसिक  आरोग्य विषयक माहितीचा अभाव असल्याने त्या त्यांच्यातील नैराश्य किंवा चिंता ओळखण्यास कमी पडत आहेत. निद्रानाश, श्वास लागणे, तळवे आणि मानेमध्ये प्रचंड घाम येणे यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या आरोग्य तक्रारी घेऊन बऱ्याचदा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. या समस्यांचा संबंध मानसिक आजाराशी असू शकतो. मानसोपचारतज्ज्ञांचा तुटवडा असल्याने अशा विकारांचे निदान करण्यास विलंब होत असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन जैन यांनी दिली आहे.

रुग्णांचे होणार पुनर्वसन

राज्यातील ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णलयात येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या दोन्ही गरजा लक्षात घेता मानसोपचारशास्त्र विकासाला गती देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. 

पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या धर्तीवर अन्य तिन्ही प्रादेशिक मनोरुग्णालयात सरकारने मनोरुग्णांसाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ अंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामुळे मानसोपचार अभ्यासक्रमासोबतच उपचाराने बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाचाही मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: World Health Day: The grime on mental health continues, more than five lakh people have received treatment in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.