World Kidney Day: चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हालाही उद्भवू शकतो किडनीचा आजार; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:44 PM2021-03-11T13:44:09+5:302021-03-11T14:59:26+5:30

World Kidney Day : गंभीर किडनी आजार ही समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत असली तरी याला प्रतिबंध घालणे आणि त्यावर उपचार करणे शक्य आहे.  भारतात गंभीर किडनी आजारांचे प्रमाण १५ -१७% आहे.

World Kidney Day : Unhealthy lifestyle can also cause kidney disease; Experts say symptoms and preventions | World Kidney Day: चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हालाही उद्भवू शकतो किडनीचा आजार; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि बचावाचे उपाय

World Kidney Day: चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हालाही उद्भवू शकतो किडनीचा आजार; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि बचावाचे उपाय

googlenewsNext

किडनीच्या आजारांचे लवकरात लवकर निदान होणे, त्यावर उपचार होणे तसेच त्यांना प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. 
डॉ. शरद शेठ, कन्सल्टन्ट व प्रमुख, नेफ्रॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल

आपल्या शरीरात किडनीचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. शरीरात पाणी व इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखणे, टाकाऊ पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर टाकणे, रक्त तयार होण्यासाठी हार्मोन्स तयार करणे, ड जीवनसत्वाचे संश्लेषण, रक्तदाब व्यवस्थित राखणे आणि शरीरात क्षार रचनेचे संतुलन राखणे अशी विविध कामे किडनी पार पाडत असते. गंभीर किडनी आजार ही समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत असली तरी याला प्रतिबंध घालणे आणि त्यावर उपचार करणे शक्य आहे.  भारतात गंभीर किडनी आजारांचे प्रमाण १५ -१७% आहे.

लक्षणे व निदान 

शारीरिक कमजोरी, श्वास घेण्यात अडथळा आणि भूक न लागणे ही गंभीर किडनी आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत.  मूत्राशयाचा विकार वाढत गेल्याने युरेमिया होतो ज्यामध्ये रुग्णाला मळमळ, उलट्या होणे, वजन कमी होणे, पाय व पावलाच्या सांध्यांवर सूज असे त्रास होऊ लागतात.  हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ऍनिमिया, रक्तदाब वाढणे, कॅल्शियम व फॉस्फरस चयापचयामध्ये व्यत्यय हे देखील होऊ लागते.  

भारतात मधुमेह आणि अतिताण हे गंभीर किडनी आजारांना कारणीभूत ठरत असल्याचे सामान्यतः आढळून आले आहे.  त्याचप्रमाणे वाढलेले वय, फिल्टरिंगचे कार्य करणाऱ्या किडनीच्या भागाला जखम होणे म्हणजेच ग्लोमेरुलोनफ्रीटिस, मुतखडे, मूत्र यंत्रणेमध्ये संसर्ग व अडथळे यामुळे देखील गंभीर किडनी आजार होतो.  सर्वसाधारणपणे किडनी आजाराची वाढ हळूहळू आणि सुप्तपणे होते त्यामुळे बऱ्याच रुग्णांना जोवर लक्षणे दिसत नाहीत तोवर या आजाराचा थांगपत्ता लागत नाही.

लघवी, रक्त यांच्या तपासण्या किंवा सोनोग्राफीमध्ये असामान्य बाबी आढळून आल्यास गंभीर किडनी आजाराचे निदान केले जाते.  रक्त तपासणी आणि लघवीचे विश्लेषण या दोन महत्त्वाच्या आणि सहज उपलब्ध असलेल्या तपासण्यांमुळे किडन्यांचे कार्य किती योग्य प्रकारे सुरु आहे ते समजून घेण्यात मदत मिळते.  या तपासण्या करून घेतल्यास किडनी आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये लक्षात येऊ शकतो.  किडनीची फिल्टरेशन क्षमता समजून घेण्यासाठी सीरम क्रिएटिनिन स्तराचे अनुमान उपयोगी ठरते.  किडनी आजार जसजसा वाढत जातो तसतसा क्रिएटिनिन स्तर वाढत जातो.  

दुर्दैवाची बाब अशी की, किडनीचे ५०%  नुकसान होईस्तोवर क्रिएटिनिन स्तर सामान्य राहतो.  लघवीमध्ये रक्त आणि अल्ब्युमिन (एक प्रकारचे प्रोटीन) आहे की नाही हे तपासण्यासाठी लघवीचे विश्लेषण केले जाते.  किडनीतील फिल्टर्स जर निरोगी असतील तर सर्वसामान्यतः लघवीमध्ये प्रोटीन नसते.  पण लघवीमध्ये जर अल्ब्युमिन आढळून आले तर याचा अर्थ असा की फिल्टर्सचे नुकसान झालेले आहे आणि हे किडनी आजाराचे लक्षण आहे.  विशिष्ट किडनी आजाराचे निदान करण्यासाठी या दोन सर्वसामान्य तपासण्यांव्यतिरिक्त रक्त परीक्षण, अल्ट्रासाउंड परीक्षण, क्ष किरण किंवा किडनीची बायोप्सी (एक छोटा तुकडा काढून घेऊन त्याचे मायक्रोस्कोप द्वारे परीक्षण करणे) यांची देखील गरज भासू शकते.

प्रतिबंध 

किडनी आजार होऊ नये यासाठी करावयाच्या दोन प्रमुख उपाययोजना म्हणजे रक्तातील शर्करा आणि रक्तदाब यांच्यावर नियंत्रण राखणे. काही औषधे देखील किडनी आजारांना कारणीभूत ठरतात.  वेदनाशामक औषधे तसेच काही आयुर्वेदिक व हर्बल उत्पादनांनी देखील किडनीचे नुकसान होऊ शकते.  डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याखेरीज अशी औषधे अजिबात घेऊ नयेत. 

उपचार 

किडनी आजारावरील सर्वसामान्य उपचारांमध्ये किडनीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या कारणावर नियंत्रण ठेवणे आणि उपचार करणे, योग्य पोषक आहार, किडनी आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यानुसार प्रोटीन सेवन यांचा समावेश असतो.  अशा रुग्णांनी खारट आणि खूप जास्त प्रोटीन असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे.  त्याचप्रमाणे ज्यामध्ये फॉस्फेट जास्त प्रमाणात असते म्हणजे बिया, दाणे, सुकवलेले वाटाणे, बीन्स, चीज असे पदार्थ प्रमाणातच खावेत.

 किडनी आजार जर शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असेल तर रेनल रिप्लेसमेंट थेरपीमध्ये डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लान्टेशन) हे पर्याय उपलब्ध आहेत.  डायलिसिसने किडनी आजार बरा केला जात नाही त्यामुळे रुग्णांना संपूर्ण आयुष्यभर डायलिसिस करत राहावे लागते.  गंभीर किडनी आजारावर सर्वोत्तम उपचार किडनी प्रत्यारोपण हा आहे.   यामुळे रुग्णाच्या जीवनाची वर्षे व गुणवत्ता वाढते.

भारतासारख्या देशात उपचारांचे महागडे खर्च, डायलिसिस आणि प्रत्यारोपण सुविधांची कमतरता हे सर्व ध्यानात घेता आजाराचे लवकरात लवकर निदाण होणे, त्यावर वेळीच योग्य उपचार करणे आणि आजाराला प्रतिबंध घालणे हे करून गंभीर किडनी आजाराच्या समस्येवर मात करणे इष्ट आणि महत्त्वाचे आहे.

Web Title: World Kidney Day : Unhealthy lifestyle can also cause kidney disease; Experts say symptoms and preventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.