World liver day 2022: तुमच्या लिव्हरचे आरोग्य जपण्यासाठी टाळा 'या' चूका, अन् करा हे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:38 PM2022-04-19T15:38:05+5:302022-04-19T15:38:29+5:30
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि चयापचय योग्यरित्या होण्यास यकृत महत्त्वाचे कार्य करते. आज खराब जीवनशैली, चुकीचा आहार, मद्यपान, लठ्ठपणा, हिपॅटायटीस बी, सी इत्यादींचा यकृतावर विपरीत परिणाम होऊन यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. 'जागतिक यकृत दिन २०२२ निमित्त जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे.
आज 'जागतिक यकृत दिन' (World Liver Day 2022) आहे. दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. शरीराच्या एकूण आरोग्यामध्ये यकृताच्या भूमिकेबद्दल माहिती आणि लोकांना यकृताशी संबंधित आजार आणि परिस्थितींबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. मेंदूनंतर यकृत (Liver) हा शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. यकृताद्वारे शरीरातील अनेक मुख्य कार्ये चालतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि चयापचय योग्यरित्या होण्यास यकृत महत्त्वाचे कार्य करते. आज खराब जीवनशैली, चुकीचा आहार, मद्यपान, लठ्ठपणा, हिपॅटायटीस बी, सी इत्यादींचा यकृतावर विपरीत परिणाम होऊन यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. 'जागतिक यकृत दिन २०२२ निमित्त जाणून घेऊया यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे.
यकृत निरोगी ठेवण्याचे उपाय
- यकृत निरोगी ठेवायचे असेल तर दररोज सकस आहार घ्या. त्यात हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर समावेश करा. पालक, ब्रोकोलीसह हिरव्या पालेभाज्या चांगल्या प्रमाणात खा. या भाज्या शरीरात नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया करण्यास मदत करतात.
- अक्रोड, एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल आहारात घ्या, कारण त्यात चांगले फॅट्स असतात, त्यामुळे यकृत निरोगी राहते.
- निरोगी यकृतासाठी स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून कार्य करते आणि यकृताला शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
- तुमच्या आहारात फळांचे प्रमाणही वाढवा. या व्यतिरिक्त, आहारात जीवनसत्त्वे समृद्ध फळांचा समावेश करा, विशेषत: लिंबूवर्गीय फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे यकृत रोगांपासून वाचू शकते.
- दिवसभर बैठे काम आरोग्यासाठी घातक आहे. निरोगी राहण्यासाठी, प्रत्येकाने दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे यकृताच्या आजारांचा धोकाही कमी होतो. फॅटी लिव्हरची समस्या देखील शरीरात कमी चरबीमुळे होत नाही.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे, काय नाही?
- जास्त प्रमाणात चॉकलेट, कँडी आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, कारण ते यकृत खराब करू शकतात. जास्त प्रमाणात लाल मांस खाणे टाळा, कारण त्यामुळे यकृत फॅटी बनते.
- सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे पदार्थ जास्त खाणं टाळलं पाहिजे. कारण ते शरीरासाठी खराब फॅट्स म्हणून ओळखले जातात. त्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश होतो.
- प्रक्रिया केलेले (Processed Food) अन्न पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण या प्रकारच्या अन्नामध्ये उच्च ग्लायसेमिक निर्देशांक असतो, ज्यामुळे फॅटी यकृत होऊ शकते. याशिवाय हे पदार्थ शरीरातील साखरेची पातळी देखील वाढवतात.
- अल्कोहोल घेणं यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. अल्कोहोल डिहाइड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करतं, ज्यामुळे यकृताला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे कठीण होतं.