जागतिक मानसिक आरोग्य दिन : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे राखाल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 08:47 AM2017-10-10T08:47:22+5:302017-10-10T08:47:36+5:30
शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात.
मुंबई - शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरु शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनःस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तत्व जगातील सर्वच समाजांमध्ये व सर्व स्तरांत रुजण्याची आवश्यकता आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून समजला जातो. यंदा कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य अशी संकल्पना घेऊन या दिवशी विविध कार्यक्रमांचे आणि व्याख्यानांचे आयोजन जगभरात केले जात आहे. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशन या दिनाचे आयोजन आणि प्रत्येक वर्षाच्या संकल्पनेची निवड करत असते.
कामाच्या ठिकाणी असणारे मानसिक आरोग्य व्यक्तींमधील परस्पर संबंध आणि कामाचा ताण यावर अवलंबून असते. यातील प्रत्येक बाबीचा आपल्या कामाच्या जागी वर्तनावर व कामावर परिणाम होत असतो. वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशनने यंदा ही संकल्पना निवडण्यामागे हेच कारण आहे. या संकल्पनेद्वारे कामाच्या ठिकाणी येणारे तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न व प्रत्येक कर्मचा-यानं आपल्या प्रश्नांबाबत खुलेपणाने इतरांशी बोलणे अपेक्षित आहे. फेडरेशनच्या मते 10 कर्मचा-यांपैकी 6 कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीची माहिती इतरांपासून लपवत राहतात. सिल्व्हर रिबन या सिंगापूरमधील एनजीओच्या निरिक्षणांनुसार, कार्यालयातील 23.4 टक्के कर्मचारी आपल्या मानसिक स्थितीबद्दल कधीही तोंड उघडत नाहीत कारण त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटत असते तर माझी स्थिती इतरांना समजणारच नाही असा ग्रह 12.8 टक्के लोक करुन घेतात आणि या कारणांमुळे ते कधीच आपल्या प्रश्नांबाबत, भीतीबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत बोलत नाहीत.
मेंटल हेल्थ फाऊंडेशन या संस्थेने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार 65 टक्के लोक कामाच्या ठिकाणी घाबरलेले असतात, आपल्या वरिष्ठांशी मानसिक आरोग्याबाबत बोलायला त्यांना भीती वाटत असते. तसेच एक तृतियांश लोकांना मानसिक प्रश्न त्रास देत असतात आणि त्याबाबत ते कधीही जवळच्या व्यक्तीशी किंवा आप्तेष्टांशी बोलत नाहीत असेही या संस्थेच्या निरीक्षणातून दिसून आले आहे. बहुतांश लोकांनी आपण मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला कामावर ठेवणे पसंत करणार नाही अशी माहिती निरिक्षणांत नोंदवली आहे. यामुळेच कामाच्या ठिकाणी खुलेपणा असणे, मानसिक प्रश्न किंवा काळजी या मुद्द्यांवर वरिष्ठांशी बोलणे, कार्यालय व कर्मचारी यांच्यामध्ये संवादाचा वेगळा दुवा स्थापन करणे असे उपाय कंपन्यांनी करावेत, असे उपाय तज्ज्ञ सुचवतात.