जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : मानसिक लवचिकता शिकता आली पाहिजे- डॉ. ओंकार जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 09:08 AM2017-10-10T09:08:00+5:302017-10-24T17:22:21+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

World Mental Health Day Special: Mental flexibility should be learned- Dr. Omkar Joshi | जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : मानसिक लवचिकता शिकता आली पाहिजे- डॉ. ओंकार जोशी

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : मानसिक लवचिकता शिकता आली पाहिजे- डॉ. ओंकार जोशी

googlenewsNext
ठळक मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी.

''डॉक्टर , हल्ली अनय (नाव बदललं आहे)  फारच उदास झालाय, काही करायचचं नाही म्हणतो. दहावीची परीक्षाही नको म्हणतोय'' अनयची आई सांगत होती. त्याचं झालं असं की अनय सुरुवातीपासूनच हुशार, हरहुन्नरी. शाळेत सगळ्या स्पर्धा, डान्स, खेळ यात अग्रेसर असायचा. मागच्या महिन्यात तो फुटबॉल खेळताना पडला. डॉक्टरांनी दोन महिने आराम सांगितला. त्यात त्याचा बराच अभ्यास बुडाला. आता तो काहीच नको म्हणतोय. अगदी परीक्षासुद्धा नको म्हणतोय. हे सगळं ऐकल्यावर मी अनयशी बोलायचं ठरवलं.

अनयशी बोलल्यावर लक्षात आले की तो मानसिक ताणामुळे निराश झालाय. अनयने सगळ्या क्षेत्रात यशस्वी व्हायलाच हवं असा पालकांचा आग्रह. त्यामुळे वेगवेगळे क्लास, स्पर्धा आणि मग दहावीची तयारी हे सगळ सांभाळताना त्याची दमछाक झाली . हल्ली अनेक तरुण मुलांशी बोलताना हे लक्षात येते की ते सतत कोणत्या न कोणत्या मानसिक ताण तणावात असतात. आपण सगळीकडे बेस्ट असलंच पाहिजे या नादात मग सगळच चुकत जातं. नोकरी , लग्न, स्पर्धा परीक्षा, घर या सगळ्याच्या ताणाला सामोरे जाताना नैराश्य, एकटेपणा, न्यूनगंड या भावना वाढीस लागतात. त्यातूनच तरुणांच्या होणारया आत्महत्या ही एक चिंतेची बाब झाली  आहे 
म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

पण या सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी. अनयच्या बाबतीतचं बघा ना. मला सगळ्याचं गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्यात मी यशस्वी झालोच पाहिजे हा हट्ट, दुराग्रह काय कामाचा ? सर्वप्रथम मी माणूस आहे. काही गोष्टी मला चांगल्या येतात आणि काही नाही हा आत्मस्वीकार करायला हवा. एखाद्या गोष्टीच्या यशापयशापेक्षाही ती करताना मिळणारा आनंद तेवढाच महत्वाचा. असं झाल्यास मग नोकरी, परीक्षा, प्रेम इत्यादी मध्ये अपयश आल्यास  टोकाच्या नकारात्मक भावना येणार नाहीत आणि यशाने 'हुरळून’ जायला होणार नाही.

जेव्हा तणाव जास्त असेल तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला लाजायचे कारण नाही.जसा हात मोडला तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जातो तसंचं मन दुखावलं तर त्या तज्ज्ञ माणसाकडे नको का जायला ? योग्य मानसोपचार , औषधे, व्यायाम , आहार, समुपदेशन या सगळ्यांच्या मदतीने मानसिक आजार बरे होतात. आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे जण फक्त निरोगीच नव्हे तर सुदृढ मनाकडे झेपावण्याचा संकल्प करुया. शुभेच्छा!

(लेखक शिर्डी येथील मन आरोग्य केंद्र येथे मानसोपचारतज्ज्ञ आहेत)

Web Title: World Mental Health Day Special: Mental flexibility should be learned- Dr. Omkar Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य