World Osteoporosis Day : 'या' कारणामुळे उद्भवतो ऑस्टीओपोरोसिस; जाणून घ्या लक्षणं अन् उपाय
By manali.bagul | Published: October 20, 2020 11:30 AM2020-10-20T11:30:31+5:302020-10-20T11:35:31+5:30
Health Tips in Marathi : थायरॉईडची समस्या, वैद्यकीय औषधांमध्ये ‘स्टिरॉइड्स’ची उच्च मात्रा यांसारखी वैद्यकीय स्थितीदेखील या आजारास कारणीभूत ठरू शकते.
डॉ. सुनीलकुमार सिंग, कन्सल्टंट, हृमॅटॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल.
ऑस्टिओपोरोसिस हा हाडे दुर्बल करणारा आजार आहे. ऑस्टिओपोरोसिस याचा शब्दशः अर्थ ‘सच्छिद्र हाडे’ असा होतो. हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला ‘मूक आजार’ असेही म्हणतात. या आजाराने हाडांची गुणवत्ता व त्यांचे प्रमाण कमी होत जाते. ती ठिसूळ होतात आणि मोडू लागतात.
कारणे
हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येतो. तसेच, आपल्या शरीरातील हाडे सतत स्वत:चे नूतनीकरण करत असतात, जुन्या हाडांच्या जागी नवीन हाडे येत असतात, या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे असंतुलन आल्यास ऑस्टिओपोरोसिस होतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळेदेखील ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. थायरॉईडची समस्या, वैद्यकीय औषधांमध्ये ‘स्टिरॉइड्स’ची उच्च मात्रा यांसारखी वैद्यकीय स्थितीदेखील या आजारास कारणीभूत ठरू शकते.
लक्षणं
आधी सांगितल्याप्रमाणे, ऑस्टिओपोरोसिस हा एक मूक रोग असल्याचे म्हटले जाते. फ्रॅक्चर होईपर्यंत सामान्यत: त्याची लक्षणे दिसून येत नाहीत; तथापि, कधीकधी पाठीतील हाडांमध्ये तीव्र वेदना आणि उंची कमी होणे ही ‘ऑस्टिओपोरोसिस’ची लक्षणे असू शकतात.
जोखीम घटक आणि प्रतिबंध
जोखीम घटक जाणून घेतल्यास एखाद्याला हा आजार होण्याची शक्यता कमी करता येते. धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, कॅल्शियमयुक्त आहार कमी प्रमाणात असणे, तसेच अंगावर सूर्यप्रकाश न घेणे, यांसारख्या जीवनशैलीविषयक गोष्टी ‘ऑस्टिओपोरोसिस’साठी धोकादायक बनतात. कॅल्शियमयुक्त आहाराचे पुरेसे सेवन, सूर्यप्रकाश अंगावर घेणे, मुलांना घराबाहेर, मैदानात खेळू देणे, नियमितपणे चालणे, मद्यपान व धूम्रपान टाळणे हे काही प्रतिबंधात्मक उपाय लक्षात ठेवले पाहिजेत.
कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांचा विचार केल्यास, रात्री अंधारात पडू नये याकरीता पुरेशी प्रकाशयोजना करावी. त्यांच्या पलंगाला ‘साइड रेल’ बसविण्याची शिफारस सामान्यतः करण्यात येते. विशेषत: वॉशरूममधील जमीन कोरडी ठेवल्याने त्यांच्या ‘फ्रॅक्चर’चा धोका कमी होऊ शकतो.
धोका कोणाला
रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये सामान्यत: ऑस्टिओपोरोसिस दिसून येत असला, तरी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध पुरुषांनाही हा आजार होतो. तरुण स्त्रिया आणि मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस फारच कमी आढळतो; परंतु जेव्हा तो त्यांनाही होतो, तेव्हा त्याची कारणे अनुवांशिक किंवा काही विशिष्ट वैद्यकीय आजार किंवा आजारावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे, ही असतात.
उपचारांचे पर्याय
‘ऑस्टिओपोरोसिस’वर उपचारासाठी दोन प्रकारची औषधे दिली जातात. त्यातील एक, हाडांच्या पुढील नुकसानीस प्रतिबंध करते आणि दुसरे, हाडांची निर्मिती सुधारते. ‘ऑस्टिओपोरोसिस’ची तीव्रता निश्चित करण्यासाठी हाडांची घनता तपासली जाते. फ्रॅक्चर होण्याआधीच या आजारावर उपचार सुरू करणे महत्वाचे आहे.
आहाराची शिफारस
कॅल्शियमयुक्त आहार मिळण्यासाठी, डेअरी उत्पादने, नाचणी, बदाम, तीळ आणि मेथी दाणे यांचा लहानपणापासूनच आहारात समावेश करण्यात यावा. ऑस्टिओपोरोसिसचा धोका असलेल्यांसाठी कॅल्शियम पूरक आहार आवश्यकच आहे. व्हिटॅमिन डी’चा स्रोत समृद्ध प्रमाणात असलेला कोणताही विशिष्ट आहार नाही. त्यासाठी सूर्यप्रकाश हाच आवश्यक आहे. सामान्यत: सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत किमान 20 ते 30 मिनिटे ऊन अंगावर घ्यायला हवे. व्हिटॅमिन डीची पूरक औषधे घेतल्यास, या ‘व्हिटॅमिन’चे रक्तातील प्रमाण सामान्य स्तरावर राखले जाऊ शकते.
व्यायाम
चालणे, धावणे यांसारख्या व्यायामांमध्ये हाडांवर शरीराचे वजन येते. हे व्यायाम प्रकार ‘ऑस्टिओपोरोसिस’साठी चांगले आहेत. पोहण्यासारख्या व्यायामामुळे ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत होत नाही, मात्र पोहणे हे पाठीच्या स्नायूंसाठी चांगले असते. पाठ आणि नितंबाचा भाग येथील स्नायूंना बळकटी आणणाऱ्या व्यायामामुळे खाली पडणे व फ्रॅक्चर होणे यांचा धोका कमी होतो. 'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
शिफारस होत असलेल्या जीवनशैलीचा अवलंब केला व त्यांची जाणीव ठेवली, तर ‘ऑस्टिओपोरोसिस’च्या उपचारात मोठ्या प्रमाणात मदत होते. ‘ऑस्टिओपोरोसिस’च्या क्षेत्रात सतत संशोधन चालू आहे. हाडांची हानी रोखणाऱ्या प्रभावी औषधांचा शोध लावण्यात येत आहे. ‘ऑस्टिओपोरोसिस’चे निदान लवकर व अधिक तंतोतंत करण्यासाठी नवीन चाचण्यांचाही शोध घेतला जात आहे. 'या' वेळी व्यायाम केल्याने टळतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका, नव्या संशोधनातून खुलासा