World Vitiligo Day : पांढरे कोड नाहीत कलंकित, सर्व गैरसमज दूर करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 05:02 PM2021-06-25T17:02:37+5:302021-06-25T17:03:13+5:30
आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो तो मेलॅनिनमुळे आणि जेव्हा मेलॅनिन निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य थांबते किंवा त्या पेशी नष्ट होतात तेव्हा पांढरे कोड उत्पन्न होते. कोणत्याही प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पांढऱ्या कोडाची समस्या उद्भवू शकते.
पांढरे कोड ही स्वयंप्रतिकारामुळे (ऑटोइम्युन) निर्माण होणारी त्वचा समस्या आहे, ज्यामध्ये त्वचेतील रंगपेशी नष्ट होतात. त्यामुळे त्वचेवर सफेद पट्टे दिसू लागतात. हे शरीराच्या कोणत्याही भागावरील त्वचेवर होऊ शकते. केसावर परिणाम होऊन केस पांढरे होऊ शकतात आणि तोंडाच्या आत देखील हे होऊ शकते. आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो तो मेलॅनिनमुळे आणि जेव्हा मेलॅनिन निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य थांबते किंवा त्या पेशी नष्ट होतात तेव्हा पांढरे कोड उत्पन्न होते. कोणत्याही प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पांढऱ्या कोडाची समस्या उद्भवू शकते.
पांढऱ्या कोडाच्या समस्येमागचे नेमके कारण अद्यापही समजलेले नाही. शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेमधील बदल, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ही समस्या असणे किंवा रोगप्रतिकार क्षमतेशी संबंधित इतर आजार जसे हायपरथायरॉइडिजम, एलोपेशिया एरेटा (केस प्रचंड प्रमाणात गळणे) आणि अतिशय गंभीर ऍनिमिया असणे यांचा संबंध पांढरे कोड होण्याशी असण्याची शक्यता असते.
ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते पण सर्वसामान्यतः तिची सुरुवात ३० वर्षे वयाच्या आधी होते. काही बाबतीत चेहरा, हात, पावले, डोळे, नाक आणि कान या अवयवांवर पांढरे कोड येते, त्याला अक्रोफेशियल व्हिटीलीगो म्हणतात. जेव्हा त्वचेच्या संपूर्ण पृष्ठभागावर पांढरे कोड येते तेव्हा त्याला सर्वत्र पसरलेला व्हिटीलीगो असे म्हणतात. सेगमेंटल व्हिटीलीगोमध्ये त्वचेच्या फक्त एका बाजूला किंवा एकाच भागावर पांढरे कोड येते. जेव्हा फक्त काही जागी त्वचेवरील रंग गेल्यासारखे दिसते तेव्हा त्याला लिमिटेड किंवा सेंट्रल व्हिटीलीगो म्हणतात. ही समस्या कशी वाढेल याचे अनुमान करणे कठीण असते. काहीवेळा पांढरे कोड वाढत राहते आणि सर्वत्र पसरते. तर काहीवेळा काहीही उपचार न करता देखील पांढरे चट्टे येण्याचे थांबते. कधी कधी काही केसेसमध्ये त्वचेचा मूळ रंग परत देखील येतो.
पांढऱ्या कोडावरील उपचार काही वेळा असमाधानकारक ठरतात. चेहरा आणि धडासाठी रिपिगमेंटेशन उपचार सर्वोत्तम असतात; हात, पाय आणि सफेद केस असलेल्या भागांवरील उपचारांना पुरेशी प्रतिक्रिया मिळत नाही. पांढरे चट्टे नवीन असतील तर उपचारांचा परिणाम लवकर दिसून येतो तर जुन्या चट्ट्यांच्या बाबतीत वेळ लागू शकतो.
त्वचेवर जखमा होऊ न देणे, संरक्षक कपडे घालणे, त्वचेवर ओरखडे आणि त्वचा कापली जाणे टाळणे अशा प्रकारे काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. या समस्येवरील उपचारांमध्ये प्रामुख्याने स्टिरॉइड्स असलेली टॉपिकल क्रीम्स, कॅल्सेन्यूरिन इन्हिबिटर्स, फोटोथेरपी यांचा समावेश असतो. तसेच काही विशिष्ट मेलॅनोसाइट पेशींच्या प्रत्यारोपणाचा समावेश असलेले विविध सर्जिकल उपचार देखील आहेत, तसेच वेगवेगळे ग्राफ्टिंग पर्याय पण आहेत.
पांढरे कोड ही समस्या जीवघेणी किंवा संसर्गजन्य नाही. ही समस्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होते असा एका गैरसमज आहे. आंबट पदार्थ, मासे, सफेद खाद्यपदार्थ इत्यादींमुळे पांढरे कोड होते असा लोकांचा समज असायचा. पण हा समज खरा असल्याचे सिद्ध करणारा कोणताही शास्त्रीय पुरावा सापडलेला नाही. पांढऱ्या कोडामुळे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ शकते, खास करून गहूवर्णीय किंवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीच्या बाबतीत ही समस्या अधिक अडचणीची ठरू शकते. यामुळे त्या व्यक्तीवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तींना कलंकित मानले जाण्याच्या घटना देखील घडतात.
-डॉ. तृप्ती डी अगरवाल, कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, ट्रीकोलॉजिस्ट व अएस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल