कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:05 PM2021-05-14T15:05:20+5:302021-05-14T16:24:24+5:30
लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने लहान मुलांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रीणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा. मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे.
या कोरोना महामारीचा परिणाम सर्वात जास्त कुणावर होत असेल तर तो आहे आपल्या घरातील लहान मुले. बाहेरील नकारात्मकता लहान मुलांना लगेच जाणवते कारण ते मोठ्या माणसांपेक्षाही संवेदनशील असतात. या लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने त्यांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रिणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा.
मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे. यावरच्या उपाययोजना खूप कमी आईवडिलांकडे असतात. श्रीनगरच्या फेहर मेडिकल ट्रस्टचे साइकॅस्ट्रीस्ट काउंसीलर डॉ. आरिफ मगरीबी खान यांनी मुलांना घरच्याघरी हसत खेळत ठेवण्याचे काही पर्याय सांगितले आहेत. काय आहेत ते पर्याय जाणून घेऊया?
आजीआजोबांच्या गोष्टी
आपल्या लहानपणी आजीआजोबांकडून विविध गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. रात्रीच्या वेळी झोप येण्यापुर्वी आपण आजी आजोबांच्या कुशीत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत झोपायचो. आताच्या छोट्या कुटुंबपद्धतीत हा आनंद मुलांपासून दुरावला आहे. त्यामुळे मुलांना पुन्हा आजीआजोबांनी सांगितलेल्या गोष्टी सांगण्याची वेळ आली आहे. त्यांना दंतकथा, परीकथा, पौराणिक गोष्टी, पंचतंत्र, संतांच्या गोष्टी अशा अनेक गोष्टी तुम्ही सांगू शकता. जेणेकरून त्यांचे तर मनोरंजन होईलच पण तुमचेही बालपण तुमच्याकडे आल्यासारखे वाटेल.
इंडोर गेम्स
कॅरम, सापशिडी, पत्ते, व्यापार खेळ असे अनेक खेळ तुम्ही या काळात मुलांशी खेळू शकता. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य तर उत्तम राहतेच पण त्यांच्या बुद्धीलाही खुराक मिळतो. लहानपणी तुम्ही कोणते खेळ खेळायचात याच्या आठवणीही तुम्ही मुलांना सांगू शकता
विविध पदार्थ करून खायला घालणे
या लॉकडाऊन (lockdown) च्या काळात मुलं सर्वात जास्त कोणती गोष्ट मिस करत असतील तर ते म्हणजे बाहेरचे पदार्थ. नेहमी बाहेर पडल्यावर ते जे पदार्थ खाण्यासाठी तुमच्याकडे हट्ट करत असतील ते पदार्थ घरच्या घरी त्यांना खाऊ घाला. ज्यामुळे मुलं तर आनंदी राहतीलच पण घरातल्या घरात असे पदार्थ बनवल्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवता येईल.
लहान मुलांना एखादी स्पर्धा देणे
या कोरोनाकाळात तुम्ही एक करू शकता ते म्हणजे लहान मुलांना एखादे काम देऊन ते पुर्ण केल्यास त्यांना भेटवस्तू देण्याचे कबूल करू शकता. यामुळे ही मुले घरात असूनही जास्त अॅक्टिव्ह होतील. त्यांचे मानसिक आरोग्यही सुधारेल.
सकारात्मक विचार
लास्ट बट नॉट द लिस्ट, हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. लहान मुलांना तुम्ही या काळात सकारात्मक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. टीव्हीवरील कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांपासून त्यांना दूर ठेवा. त्यांना समजवा की हे फार कमी काळासाठी आहे, आपण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत. त्यांना कोरोनाकाळातील योद्धांच्या सकारात्मक गोष्टी सांगा त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि या काळातही लहान मुले सकारात्मक राहतील.
लहान मुले हे देशाचं भवितव्य आहे. आपल्या देशातील लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या वयात त्यांच्या मनावर जो परीणाम होतो तो कायमस्वरुपी राहतो. हा जर नकारात्मक असेल तर त्याची फळंही नकारात्मकच असतील. त्यामुळे पालकांनो काळजी घ्या या नकारात्मक काळात पाल्यांना जास्तीत जास्त सकारात्मक ठेवा, त्यांचे मनोबल वाढवा.