चिंताजनक! कुटुंबापासून दूर राहणारे तरुण होताहेत उच्च रक्तदाबाचे शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 09:08 AM2019-05-17T09:08:47+5:302019-05-17T09:49:08+5:30
अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे.
लखनौ - बदलत्या काळाबरोबर शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. कुटुंबापासून दूर राहत असलेले अनेक तरुण हायपरटेन्शनची शिकार होत असल्याचे एका अभ्यासामधून समोर आले आहे. अति तणाव आणि खाण्यापिण्याचे बदललेले चक्र यामुळे रक्तदाबाचा ताळमेळ बिघडत असून, त्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाची (हायपरटेन्शन) शिकार होत आहेत.
आतापर्यंत 45 वर्षांपलीकडील व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास होत होता. मात्र आता 30 वर्षे वयोगटातील तरुणही या आजाराची शिकार होत आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे हायपरटेन्शनची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जेव्हा असा रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात येतो तेव्हाच त्याला हायपरटेन्शनची बाधा झाल्याचे निदान होते. यासंदर्भात अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियॉलॉजीने हायपरटेन्शनचे मानदंडही कमी केले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. याआधी रक्तदाब हा 140-90 एमएमएचजी असल्यासच हायपरटेन्शनची शिकार मानले जात असे. मात्र आता रक्तदाब 130-80 एमएमएचजी असेल तरीही रुग्णाला हारपरटेन्शनची शिकार मानली जाते.
हायपरटेन्शन दोन प्रकारचे असते. एक इसेंशियल जे वयासोबत होते. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे हायपरटेन्शनची शिकार झालेले असतात. मात्र त्यांना हृदयविकाराचा त्रास का सुरू झालाय. याचे कारण समजत नाही. तर दुसरे सेकंड्री जे मुलांमध्ये कमी वयात किंवा वृद्धांमध्ये होते. मात्र आता दुसऱ्या प्रकारामधील रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. त्यामुळे जर तुमचे वय 30 पेक्षा अधिक असेल तर नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करा. तसेच तुम्हाला किडनी आणि डोकेदुखीचा त्रास असेल तर काही महिन्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासा, असा सल्ला डॉक्टर देतात.