चुकीची लाइफस्टाइल उडवेल तुमची झोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:36 PM2018-01-19T19:36:57+5:302018-01-19T19:40:39+5:30
मानसिक, शारीरिक स्थितीवरही होईल विपरित परिणाम..
- मयूर पठाडे
रात्री बेरात्री झोपेतून उठणं, सारखी सारखी झोप डिस्टर्ब होणं, अगोदर झोपेचा त्रास सुरू होणं, नंतर निद्रानाशात त्याचं रुपांतर होणं आणि रात्री झोपेत अधून मधून काही क्षणांसाठी थेट श्वासच बंद होणं, नंतर पुन्हा सुरू होणं असे प्रकार अनेकांमध्ये दिसून येतात. तुमची चुकीची लाइफस्टाइल हे त्याचं कारण असू शकतं. झोपेच्या या त्रासाबाबत वेळीच काळजी घेतली नाही, तर हा विकार वाढत जातो आणि नैराश्यानं ती व्यक्ती ग्रासली जाते.
आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी नुकतंच यावर मोठं संशोधन केलं आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हा विकार मोठ्या प्रमाणात होतो, असं संशोधकांना यात आढळून आलंय. पुरुषांनाच याचा जास्त त्रास का, झोपेच्या तक्रारी वाढत जाऊन मोठ्या होतात आणि नैराश्यात त्याचं रुपांतर कसं होतं, याचं ठोस आणि नेमकं कारण मात्र त्यांना सापडू शकलं नाही. त्यावर त्यांचं अद्याप संशोधन सुरू आहे.
डॉ. कॅरोल लॅँग हे त्यातले प्रमुख संशोधक असून त्यांचं म्हणणं आहे, झोपेच्या तक्रारींकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, नाहीतर रात्रीची ही जागरणं तुमची केवळ झोपच नाही, तर तुमचं सारं आयुष्यच बेचव करेल, नासवून टाकेल.
प्रमाणाबाहेर कष्ट झाल्यामुळे झोप येत नाही, त्यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात, पण फार शारीरिक कष्ट तुम्ही करीत नसतानाही तुमच्या झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या असतील, तर निद्रानाशाकडे तुमची वाटचाल होते. झोपेत मध्येच काही क्षणांसाठी श्वास बंद होणे, सुरू होणे असे प्रकार सुरू होतात आणि त्यानंतर गंभीर स्वरुपाच्या नैराश्याकडे तुमची वाटचाल होऊ शकते. मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढत जातात. रात्री झोप न आल्यामुळे आपोआपच तुमची विश्रांती होत नाही आणि तुम्हाला थकल्यासारखं, लिथार्जिक वाटतं.
नुकतंच झालेलं हे संशोधन आणि यापूर्वीची संशोधनंही सांगतात, तुम्हाला खूप ताण असला, सततच्या काळजीनं तुम्ही ग्रस्त असाल, तुमची लाइफस्टाइल चुकीची असेल आणि काही वेळा, तुम्ही सातत्यानं तुमच्या काही आजारांसाठी औषधं घेत असाल तर त्यामुळेही तुमच्या झोपेच्या तक्रारी वाढतात आणि त्यानंतर त्या वाढत जाऊन नैराश्यात त्याचं रुपांतर होतं.