आयुर्वेद आणि योगची साथ; मूत्र असंयमावर करूया मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 03:21 PM2018-08-10T15:21:46+5:302018-08-10T15:21:57+5:30

जगातील दोन तृतीयांश महिलांना मूत्र असंयमाचा त्रास भेडसावतो

yoga and Ayurveda can cure Urinary incontinence | आयुर्वेद आणि योगची साथ; मूत्र असंयमावर करूया मात

आयुर्वेद आणि योगची साथ; मूत्र असंयमावर करूया मात

googlenewsNext

- शर्वरी अभ्यंकर

बऱ्याच दिवसांनी आम्हा मैत्रिणींचा ग्रुप जमला होता. थट्टा मस्करी जोक्स ना उधाण आलं होतं . हसून हसून पोट दुखायला लागलं सगळ्यांचं.अपवाद फक्त रोहिणीचा . सुरुवातीला उत्साही असलेली रोहिणी आता मात्र अस्वस्थ, उदास जाणवायला लागली. माझ्या नजरेतून हे काही सुटलं नाही. गेट टूगेदर नंतर तिला गाठून विचारलंच तर बिचारीचे लगेच डोळे भरून आले , म्हणाली " अगं सध्या माझी फार लाजिरवाणी अवस्था होतेय, जरा जोरात हसले ,खोकले की लघवीचे थेंब बाहेर येतात, हे अगदी आता नेहमीचे झालेय, मगाशी सुद्धा तुम्ही एवढी छान मजा करत होतात पण त्याचा माझ्या या अशा प्रॉब्लेममुळे मी आनंद नाही घेऊ शकले. कुठेही बाहेर जाताना मी अगदी अस्वस्थ होऊन जाते, कुठे काही फजिती होईल की काय याची सारखी भीती वाटते. "

लोकहो, हा प्रॉब्लेम फक्त रोहिणीचा नसून जगभरातील स्त्रियांचा असून, बऱ्यापैकी कॉमन आणि लाजिरवाणा असा प्रॉब्लेम आहे. याला मराठीत मूत्र असंयम किंवा अनैच्छिक मूत्रप्रवृत्ती म्हणतात, पण युरिनरी इनकॉन्टिनेन्स या इंग्लिश नावानेच तो जास्त प्रसिद्ध आहे

युरिनरी इनकॉन्टिनेन्स-म्हणजे मुत्राशयावरचे नियंत्रण सुटणे. याची तीव्रता , कधी कधी खोकताना किंवा शिंकताना ,जोरात हसताना थेंब थेंब मूत्र प्रवृत्ती होणे यापासून जोरात मूत्र वेग आला असता त्यास अजिबात नियंत्रित न करता येणे इथ पर्यंत असू शकते. युरिनरी इनकॉन्टिनेन्स साधारणतः चार प्रकारचा असतो. स्ट्रेस इनकॉन्टेनन्स, अर्ज इनकॉन्टेनन्स, ओव्हर फ्लो इनकॉन्टेनन्स आणि फंकशनल इनकॉन्टेनन्स, ज्यात स्ट्रेस इनकॉन्टिनेन्स नेहमी आढळणारा आणि जास्तीत जास्त लोकांना विशेषतः स्त्रियांना भेडसावणारा प्रकार आहे. यामध्ये जेव्हा पोटाच्या आतील दाब वाढतो, त्यावेळी थोडेसे मूत्र आपोआप बाहेर येते. उदा. खोकताना, शिंकताना, जोरात हसताना, वजनदार वस्तू उचलताना इत्यादी.

इथे एक लक्षात घ्यावे ,युरिनरी इनकॉन्टिनेन्स हा आजार नसून ते एक लक्षण आहे.

श्रोणी प्रदेशातील(पेल्व्हिक फ्लोर ) स्नायू तसेच मुत्राशयातील मूत्रास धरून ठेवणारे( detrusor ) स्नायू सैल , अशक्त झाल्यामुळे हे लक्षण दिसून येते . हे स्नायू अशक्त होण्याची निरनिराळी कारणे असतात. गरोदरपणात, अपत्य जन्मानंतर, मेनोपॉज, गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया या कारणांमुळे स्त्रियांमध्ये मूत्र असंयम दिसून येतो तर पुरुषांमध्ये वाढते वय, प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, मूत्र मार्गातील इतर अडथळे जसे ट्यूमर, मज्जा संस्थेतील काही आजार या कारणांमुळे स्ट्रेस इनकॉन्टेनन्स दिसू शकतो. त्याच बरोबर अति प्रमाणात वजन वाढ, दारूचे व्यसन यामुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो. हr सततची मूत्र गळती मानसिक आणि सामाजिक स्तरावर त्रासदायक तर होतेच, पण यामुळे शरीरावर/आरोग्यावर इतर लक्षणे सुद्धा दिसतात उदा मूत्र मार्गाजवळील त्वचेवर पुरळ उठणे, चट्टे पडणे, मूत्र मार्गात जंतू संसर्ग होणे.

आयुर्वेद आणि योग यांच्या संयुक्त चिकित्सेने या विकारावर आपण सहज मात करू शकतो  आयुर्वेदानुसार मूत्र प्रवृत्ती हे वात या दोषाचे कार्य आहे तसेच मूत्राशय हे सुद्धा वाताचे स्थान आहे. त्यामुळे वात दोषावर कार्य करणारी आणि मांस धातूला सबळ करणारी (कारण युरिनरी इनकॉन्टेनन्स मध्ये स्नायू सैल झालेले असतात ) अशा औषंधाची, उदा अश्वगंधा, बला, त्रिफळा, त्रिवंग भस्म इत्यादी उपाय योजना खूप छान परिणाम दाखवते. त्याचबरोबर तेलाची बस्ती (मात्रा बस्ती- जे पंच कर्मातील एक कर्म आहे) दिली असता रुग्ण लवकरच या सर्व लक्षणांपासून मुक्त होतो. परंतु लक्षात असू द्या ही सर्व चिकित्सा आयुर्वेद तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच घेणे गरजेचे आहे, या बाबतीत गुगल आणि व्हाट्स ऍप च्या नादी न लागणेच इष्ट .

आयुर्वेद चिकित्सेला योग चिकित्सेची जर जोड दिली तर सोन्याहून पिवळे . योग मधील आसने , श्रोणी प्रदेशातील(पेल्व्हिक फ्लोर ) स्नायू घट्ट , सशक्त करण्यास मदत करतात उदा . सेतू बंधासन, उत्कटासन, त्रिकोणासन इत्यादी. सर्वात जास्त परिणाम दाखवतात त्या म्हणजे योग मुद्रा आणि बंध.

मूल बंध, अश्विनी मुद्रा, वजरोली मुद्रा यांची संयमाने केलेली साधना मूत्र असंयमात कमालीची उपयुक्त आहे. आधुनिक विज्ञान चिकित्सेत सुद्धा याच मुद्रा किगेल exercise नावाने प्रसिद्ध आहेत. ही सर्व आसने आणि मुद्रा तज्ञ योग शिक्षकाकडूनच शिकून घ्याव्यात अन्यथा उपायापेक्षा अपायाची भीतीच जास्त.

माझी मैत्रीण, रोहिणीने आयुर्वेद आणि योग यांच्या साहाय्याने यूरिनरी इनकॉन्टेनन्स वर चांगलंच नियंत्रण आता मिळवलंय आणि तिला दिलखुलास हसताना बघून माझा आयुर्वेद आणि योग वरचा विश्वास अजूनच बळावलाय.

 

Web Title: yoga and Ayurveda can cure Urinary incontinence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.