जीममध्ये 'या' गोष्टी टाळा नाहीतर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 12:02 PM2018-05-22T12:02:02+5:302018-05-22T12:02:02+5:30
उतावळेपणातच अनेकजण स्वत:चं नुकसान करुन घेतात. त्यामुळे जीममध्ये काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. अशात जिममध्ये काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
सिनेमातील हिरोंची सिक्सपॅक बॉडी पाहून अनेकजण जीमच्या नादाला लागतात. पण बॉडी बनवणं इतकं सोपं नाहीये. पण अनेकांना कमी वेळातच सिक्सपॅक बॉडी मिळवायची असते. या उतावळेपणातच अनेकजण स्वत:चं नुकसान करुन घेतात. त्यामुळे जीममध्ये काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. अशात जिममध्ये काय करु नये हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
- जीममध्ये गेल्यावर थेट मशीनवर व्यायामाला सुरुवात करू नका. आधी थोडं वॉर्मअप करा. स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीर व्यायामासाठी तयार होईल. वॉर्मअप न करता व्यायाम सुरू केला तर पाठ आणि अंगदुखी होऊ शकते.
- जीममधली उपकरणं आपल्या गरजेनुसार अँडजस्ट करून घ्या. या उपकरणांवर इतरांनी व्यायाम केलेला असतो. त्यामुळे आपल्या सोयीनुसार मशीनची रचना करून घ्या.
- जीममध्ये जाताय म्हणून अतिरिक्त प्रोटिन्स घेऊ नका. जास्त प्रोटिन्समुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. वजनानुसार प्रथिनं खा. एक किलो वजनाला साधारण 1.50 ग्रॅम प्रथिनांची गरज असते.
- व्यायामानंतर साधारण पंधरा मिनिटं पाणी पिऊ नका. पण त्यानंतरही पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
- आरोग्यदायी फॅट्स पदार्थांचे सेवन करा. बदाम, अक्रोडसारखे पदार्थ खा. हे पदार्थ न खाल्ल्यास डिप्रेशन, रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
- जीमनंतर लगेच कॉफी पिऊ नका. व्यायामानंतर खूप घाम आल्याने शरीरातलं पाणी कमी होतं. कॉफीमुळे ही शक्यता तीव्र होऊ शकते.