व्यायामाला वेळ नाही? मग फक्त उभे राहा, तुमच्या कॅलरीज अन् फॅट्स चुटकशीसरशी बर्न होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:17 PM2021-09-21T13:17:47+5:302021-09-21T13:19:56+5:30
तुम्ही उभं राहून काम केलंत तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते. रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं. तर मग जाणून घेऊया उभं राहून कसं काय फॅट बर्न करता येतं ते.
व्यायाम करणं (Exercise) हे महत्त्वाचं आहे पण सध्या घरी बसून कॉम्प्युटरवर काम करण्याची पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे अनेकां व्यायामाला वेळच मिळत नाही. बसून-बसून पाठीला बाक येतो. कॉम्प्युटर स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण येतो तरीही तसंच काम करत रहावं लागतं. पण याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणं (Weight Gain), इतर व्याधी जडणं हे दिसायला लागले की माणूस व्यायाम करण्याचे मार्ग शोधू लागतो. आम्ही आज तुम्हाला काही अशा छोट्या युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅलरी काही प्रमाणात बर्न (Burning Calories) करता येतील.
हेल्थशॉट्स या वेबसाइटवर युरोपियन हार्ट जर्नलमधील एक संशोधन प्रकाशित झालं आहे. त्यानुसार तुम्ही उभं राहून काम केलंत तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते. रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं. तर मग जाणून घेऊया उभं राहून कसं काय फॅट बर्न करता येतं ते.
स्टँडिंग डेस्कचा वापर करा
साधारणपणे सर्वजण ७ ते ८ तास एकाजागी बसून काम करतात. तुम्हीही तसं करत असाल तर तुम्ही स्टँडिंग डेस्कचा (Standing Desk) वापर करा. म्हणजे तुमच्या डेस्कच्या जवळ उभं राहून काम करा जेणेकरून कंबरेखालच्या भागात रक्ताभिसरण सुधारेल आणि तुम्हाला शरीरातील जादाची चरबी बर्न करायला मदत होईल.
मल्टिटास्कर व्हा
तुम्ही मल्टिटास्कर होण्याचा प्रयत्न करा. उदाहरणच द्यायचं झालं तर हे बघा तुम्ही जर जास्तवेळ कॉन्फरन्स कॉलवर बोलत असाल तर ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडसेट वापरून चालता-चालता कॉलवर बोला. यामुळे तुमच्या मीटिंग सुरूही राहतील आणि चालल्यामुळे शरीरी क्रियाशील राहून कॅलरीही जळतील.
सक्रियता वाढवा
शक्य असेल तेवढं कामातून छोटा ब्रेक घ्या शरीराला सक्रिय करा म्हणजे हातपाय हलवा, चाला किंवा वॉर्मिंग अप व्यायाम (Warming Up) करा. असे सक्रिय राहिलात तर तुमचा मूडही सुधारेल आणि कामात लक्षही लागेल. त्याचबरोबर ऑफिसात जाताना लिफ्टऐवजी (Elevator) जिन्याचा वापर करा. तुमची गाडी ऑफिसच्या मुख्य इमारतीपासून दूर पार्क करा म्हणजे तिथून चालत तुम्हाला ऑफिसात जाता येईल. चालणं झालं की आपोआप कॅलरी बर्न होतील.
ट्रॅकिंग करा
स्मार्ट वॉचचा वापर करा आणि आपण दिवसात किती पावलं चाललो हे ट्रॅक करा. आज १ हजार पावलं चाललो तर दुसऱ्या दिवशी १ हजार ५०० पावलं चालण्याचं उद्दिष्ट निश्चित करा जेणेकरून आणखी थोडी प्रगती होईल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वत: ला प्रेरित करण्यासाठी आदल्यादिवशी आपण १ हजार पावलं चालल्याचं ट्रॅकिंग रेकॉर्ड मदत करेल.