तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आणखी किती वर्षं जगाल? कधी येणार तुम्हाला मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 03:46 PM2017-06-02T15:46:48+5:302017-06-02T15:46:48+5:30
‘गंमत’ नाही, तुमच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे हे आता संगणक ‘खात्री’नं सांगणार..
- मयूर पठाडे
‘संपलं तुमचं आयुष्य. तुमच्या आयुष्यातली शेवटची पाच वर्षं आता उरली आहेत. एवढ्या काळात जे करायचं ते करून घ्या’, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर?
तुम्ही नक्कीच त्याला म्हणाल, भाऊ, हा काही हिंदी चित्रपट नाही कि त्याची स्टोरी. जे काही बोलायचं ते नीट आणि स्पष्ट बोल..
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही काही आता ‘गंमत’ राहिलेली नाही. तुम्ही खरंच अजून किती वर्षं जगाल, तुमच्या आयुष्याची नौका कधी पैलतीरी लागेल, हे बऱ्यापैकी ठामठोकपणे सांगू शकेल असं तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. शास्त्रज्ञांनी आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या साहाय्यानं ही अशक्यातली गोष्ट जवळपास शक्य केली आहे.
त्यासाठी कंम्प्युटर टेक्नॉलॉजीचीही मदत घेतली आहे. तुमच्या फोटो इमेजेस पाहून हा कॉम्प्युटर सांगू शकेल,तुमचं आयुष्य पाच वर्षांपेक्षा जास्त आहे की कमी!
हे कंम्प्युटर प्रोग्रामिंग रुग्णाचे फोटो पाहून नेमकं कशाच्या आधारे तुमच्या आयुष्याची भविष्यवाणी वर्तवतो हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरीही शरीराच्या पेशीजालाला आलेल्या सुजेसारखे जुनाट विकार आणि रक्तसंचयामुळे हृदयात होणारे बिघाड यासारख्या विकारांवर ही संगणकप्रणाली खात्रीने तुमच्या आयुष्याची भविष्यवाणी वर्तवू शकते असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
अलीकडच्या काळात हार्ट अटॅक आणि इतरही अनेक गंभीर विकारांच्या संदर्भातील रुग्णांबाबत त्यांच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे याची भविष्यवाणी हा संगणक वर्तवू शकेल. त्यामुळे अशा आजारांचं लवकर निदान होऊन या रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळेल आणि त्यांना जीवदान मिळू शकेल अशीही शास्त्रज्ञांना खात्री आहे.