तुमचे डोळेच ‘सांगतील’ टीबीचा आजार..
By Admin | Published: June 15, 2017 05:55 PM2017-06-15T17:55:19+5:302017-06-15T17:55:19+5:30
व्हिटॅमिन ‘ए’ची मात्रा तुमच्या आयुष्यावरही राखते कंट्रोल
- मयूर पठाडे
व्हिटॅमिन ‘ए’चं महत्त्व काय? डोळ्यांसाठी अ जीवनसत्वाचं महत्त्व अतिशय मोठं आहे आणि त्याअभावी डोळ्यांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं, हे आव्हाना आपल्या साऱ्यांना आता माहीत झालं आहे, मात्र अ जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे टीबीतही वाढ होऊ शकते, हे नव्या संशोधनातून समोर आलं आहे.
ज्यांना टीबी असेल किंवा टीबीची लक्षणं ज्यांच्यात दिसत असतील, त्यांच्यासाठी तर अ जीवनसत्त्वाचं महत्त्व खूपच जास्त आहे. त्यांनी आपल्या आहारात व्हिटॅमिन ए चा आवर्जुन समावेश करायला हवा. अशा लोकांमध्ये जर अ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली तर त्यांच्या टीबीत तब्बल १० पटींनी वाढ होऊ शकते. अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात विस्तृत अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
त्यामुळेच आहारात अ जीवनसत्त्वाचं महत्त्व खूपच अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही यासंदर्भात दक्षतेचा इशारा दिला असून विकसनशील देशांतील लोकांनी आपल्या आहारात अ जीवनसत्त्वाचा अधिकाधिक वापर करावा, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही, असा सल्ला दिला आहे.
दहा ते १९ या वयातील मुलं आणि तरुणांनी तर यासंदर्भात आपल्या आहारावर अधिकच लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्यातील टीबीच्या प्रमाणात वीस पटीपेक्षाही वाढ होऊ शकते.
अ जीवनसत्त्व जसं निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहे, तसंच टीबी आणि अ जीवनसत्त्वाचा खूपच जवळचा संबंध आहे.