तुमचा जिम पार्टनर सेहद के लिए हानीकारक है?- हे कसं ओळखाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 07:13 PM2017-06-09T19:13:02+5:302017-06-09T19:13:02+5:30
आपण जिम पार्टनर म्हणून ज्याला सोबत नेतो, तो खरंच आपली साथ देतो का?
- निशांत महाजन
सध्या जिम पार्टनर करण्याची एक फॅशनच आलेली आहे. सेलिब्रिटींचे जिम पार्टनर असतात मग आपले का असू नयेत? असं वाटतंच, त्यात दोघातिघांनी मिळून जिमची पार्टनरशिप घेतली तर ती स्वस्त पडते. म्हणून जिम एकत्रित लावलंही जातं. मात्र ज्यांच्यासोबत आपण जिमला जातो त्यांची आपल्याला मदत होते की ते आपल्यासाठी हानीकारक आहेत की नाही हे कसं ओळखणार? ते तसे असतील तर आपल्या व्यायामाचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजा.आपणही इतरांना असाच त्रास देतोय का, हे तपासून पाहिलेलं बरं.
लेट लतीफ
अनेकजण लेट लतीफ असतात. रोज सकाळी त्यांना घ्यायला जातो. तर ते झोपलेलेच. रोज उशीर करतात. त्यांच्यामुळे आपला वेळही जातो आणि मूडही जातो. त्यांना बाय म्हटलेलं बरं.
गॉसिपवाले
काहीजण आपल्या शरीराच्या नसलेल्या मसलटोनचे, वजनाच्या आकड्यांचे, नसलेल्या फिटनेसचे गॉसिप जिमच्या बाहेर, आॅफिसात, मित्रांमध्ये करतात. आपली थट्टा करतात, त्यांच्यासोबत जावू नये.
स्पर्धेचा कहर
सतत इतरांशी स्पर्धा करतात. आपल्याला स्पर्धा करायला भाग पाडतात. रेस लावतात. त्यातून व्यायामाचे अनिष्ट परिणाम शरीरावर होवू शकतात.
पुश करतात
अनेकजण आपल्याला प्रेरणा देण्याच्या नावाखाली पुश करतात, रेटे देतात.जास्त व्यायाम करायला भाग पाडतात. मात्र त्यातून शरीरावर दुष्परिणाम होवू शकतात. ट्रेनरचं ऐका, या मित्रांचं नको.
आहाराचे फुकट सल्ले
प्रोटीन पावडरी घ्यायला भाग पाडतात. नस्ते व्यायामाचे सल्ले देतात. आपल्याला कन्फ्यूज करतात. त्यामुळे त्यांचे सल्ले आणि सोबत टाळा.
टीका-टोमणे
काहीजण सतत टीका करतात, टोमणे मारतात, तुला जमणारच नाही म्हणतात, शरीराच्या ठेवणीवरुन चिडवतात. त्यांना सोबत घेवू नका. ते व्यायामाचा उत्साह मारुन टाकतात.