..म्हणूनच तुमचं डोकं काम करीत नाही!
By admin | Published: June 15, 2017 05:48 PM2017-06-15T17:48:42+5:302017-06-15T17:48:42+5:30
‘मेमरी लॉस’पासून वाचायचं असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात..
- मयूर पठाडे
अगदी साधा प्रश्न.. तुमच्या रोजच्या आहारात काय काय असतं? म्हणजे तुम्ही रोज आपल्या जेवणात काय खाता? आपल्या भारतीय पद्धतीनं, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबिर.. असं तुम्ही खाता कि पिझ्झा, पिझ्झा, बर्गर, स्पाघेटी.. असलेच पदार्थ तुमच्या खाण्यात जास्त असतात?
भारतीय पद्धतीचा आहार जर तुम्ही रोज घेत असाल, तर उत्तमच आहे, पण पाश्चात्य पद्धतीच्या आहारावर जर तुमचा रोज आणि जास्तीत जास्त भर असेल, तर ते मात्र तुमच्या तब्येतीला नक्कीच चांगलं नाही. ते नुसतं तब्येतीलाच वाईट आहे, असं नाही, तर तुमच्या असलेल्या आणि नसलेल्या आजारांचं प्रमाणही कित्येक पटीनं वाढवतं. त्यातलाच मुख्य आजार आहे अल्झायमर. या अल्झायमरमुळे तुमच्या मेमरीचा लॉस होतो आणि अगदी साधी साधी कामं करणंही नंतर तुम्हाला मुश्कील होऊ शकतं. त्यामुळे भारतीय आहाराचं महत्त्व आजही खूपच महत्त्व आहे.
अर्थातच भारतीय आहार म्हणजे तुम्ही अगदी रोज चौरस आहारच घेतला पाहिजे असं नाही, पण आपल्या मूळ आहारावर मात्र तुम्ही भर दिला पाहिजे.
शास्त्रज्ञांनी यासंदर्भात नुकतंच एक महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. ज्या प्रकारच्या आहारात कोलेस्टोरॉल, साखर यांचं प्रमाण जास्त असतं असा आहार तुमच्या आरोग्यासाठी फारच घातक आहे आणि त्यामुळे तुुम्हाला अल्झायमरचा धोका होऊ शकतो असं या शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे. पाश्चात्य आहारात प्रामुख्याने हे घटक जास्त असतात.
तुमचे जिन्स कसे आहेत, यावरही तुम्ही कसे आहात आणि भविष्यात कसे असणार आहात हे अवलंबून असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला आहार तर आपल्या भूभागाशी, वातावणाशी सुसंगत असा तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपली लाइफस्टाइल कशी आहे, तेही एकदा तपासून पाहा. रोज व्यायाम करीत नसाल तर व्यायामाकडे लक्ष द्या. आठवड्यातून किमान चार दिवस, चाळीस मिनिटं तरी व्यायाम झालाच पाहिजे. या गोष्टींकडे लक्ष द्याल, तर तुमचा भविष्यकाळ नक्कीच सुखकारक असेल.