संध्याकाळच्या व्यायामानं वाढेल तुमची पॉवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:21 PM2017-11-10T17:21:30+5:302017-11-10T17:22:41+5:30
सकाळच्या व्यायामानं होईल शरीर, मनाला फायदा..
- मयूर पठाडे
सकाळच्या वेळी व्यायाम करणं फायदेशीर आहे, हे तर खरंच, पण कोणत्या वेळी व्यायाम करावा हे बºयाचदा त्या त्या व्यक्तीची सवड आणि आवडनिवडीनुसारही ठरतं. काहीवेळा मित्रमंडळी किंवा जोडीदार ज्यावेळी व्यायामाला, जिममध्ये जात असेल, त्याच वेळेस जाणं अनेकांना सोयीचं आणि महत्त्वाचंही वाटतं..
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी केलेला व्यायाम वेगवेगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर ठरतो. तुम्हाला व्यायामाची सवय असेल, व्यायामात काही ध्येय तुम्हाला साध्य करायचं असेल, बॉडीबिल्डर तुम्हाला बनायचं असेल किंवा त्यातली पुढची पायरी गाठायची असेल किंवा अतिशय इंटेन्सिव्ह व्यायाम तुम्हाला करायचा असेल, मग तो जिममध्ये जाऊन केलेला असो किंवा कुठल्या खेळासाठी, परफॉर्मन्स वाढवण्यासाठी करायचा असो, संध्याकाळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर ठरतो.
संध्याकाळी केलेला व्यायाम तुमच्या व्यायामाची तीव्रता वाढवू शकतो. संध्याकाळच्या व्यायामामुळे तुमच्या परफॉर्मन्समध्येही वाढ होऊ शकते. पॉवर वाढवण्यासाठी सकाळपेक्षा संध्याकाळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर ठरू शकतो.
याची मुख्य दोन कारणं आहेत. सकाळच्या वेळेपेक्षा संध्याकाळी तुमचं बॉडी टेम्परेचर बºयापैकी जास्त असतं. त्यामुळे तुमचे मसल्स आणि जॉइंट्स जास्त ताण सहन करु शकतात. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे या काळात व्यायामामुळे होऊ शकणाºया इंज्युरीचं, दुखापतीप्रमाण कमी असतं. दुखापतीचा धोका संध्याकाळच्या व्यायामामुळे बºयाच प्रमाणात कमी होऊ शकतो. सकाळच्या व्यायामानं शरीर, मनाला जास्त फायदा होतो, पण संध्याकाळचा व्यायाम ताकद वाढवण्यासाठी उत्तम ठरू शकतो.
अर्थात सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायाम करीत नसाल, तर आधी व्यायाम सुरू करणं ही पहिली पायरी आहे. कोणत्या वेळी करायचा याचा विचार नंतर..
मग करताय ना व्यायाम सुरू? आत्ता, आजपासून?..