तुमचा अंगठा होईल वाकडा! धोका ओळखा : ८ तासांहून जास्त वेळ गेम खेळतात भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:33 AM2023-02-28T08:33:02+5:302023-02-28T08:33:12+5:30
सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : परवडणारे इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे अलीकडच्या वर्षांत भारतीय गेमिंग क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, सुधारित पायाभूत सुविधांसह गेमिंगबद्दलची वाढती रूची गंभीर समस्यांनाही आमंत्रण देत आहे. अलीकडेच आलेल्या इंडिया मोबाइल ऑफ गेमिंगच्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात तर, ६० टक्के गेमर्स एकावेळी सतत ३ तास गेम खेळतात. सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोणते आजार होतात?
n अंगठ्याची हालचाल करणाऱ्या टेंडनना सूज
n मोबाईल गेम खेळणाऱ्यांची बोटे सुजल्यामुळे वाकडी होतात किंवा वाकतात आणि ती सरळ करता येत नाहीत.
n कोपरभोवती सूज येते
n जास्त गेमिंगमुळे डोळ्यांवर दाब
n उदासीनता व डिप्रेशन होऊ शकते.
n हिंसक वृत्ती वाढते, जास्त चिडचिड किंवा रागीट स्वभावात बदल होणे.
काय कराल?
n गेमिंगचे व्यसन असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
n कौटुंबीक समुपदेशन : व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या मित्रांना रुग्णाला कसे हाताळायचे हे समजावून सांगितले जाते.
n मानसशास्त्रज्ञांच्या मते, सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळायला सुरूवात होते, पण याचे सवयीमध्ये, आणि नंतर व्यसनामध्ये रूपांतर होते व जीवनाचा महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्याला कळत नाही.