तुमचं वजन जागेपणी नाही, झोपेत वाढतं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:39 PM2018-02-08T17:39:57+5:302018-02-08T17:41:09+5:30
आपल्या कॅलरीजही जळतात, त्या जागेपणी नव्हे, झोपेत!
- मयूर पठाडे
आपल्याला वाटतं, अपुºया झोपेमुळे आपल्या आरोग्यावर असा काय विपरित परिणाम होतो? कमी झोपलं, जागरणं केली तर त्यानं काय बिघडतं? आपला वेळ झोपेत वाया घालवण्यापेक्षा त्याचा ‘सदुपयोग’ करणं केव्हाही चांगलंच नाही का?..
झोपेचा आणि वजनवाढीचा खूप जवळचा संबंध आहे, असं सांगितल्यावर तर या माणसाला वेड लागलंय की काय, असंच ऐकणाºयाचा समज होतो..
पण थांबा, याबद्दलचे गैरसमज इथेच थांबलेले नाहीत.
आपल्या शरीराच्या कॅलरीज जागेपणी जेवढ्या जळतात, त्यापेक्षा जास्त कॅलरीज झोपेत जळतात, असं सांगितलं तर अनेकांना फिट यायचीच तेवढी बाकी राहील.
पण शास्त्रज्ञांनी याबाबत मुलभूत संशोधन केलेलं असून याबाबतची आकडेवारीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे.
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, संपूर्ण दिवसभरात आपल्या जेवढ्या कॅलरीज जळतात, त्यातल्या सुमारे ६० ते ६५ टक्के कॅलरीज ज्यावेळी आपण झोपेत असतो, त्यावेळी जळतात! त्याचवेळी जागेपणी मात्र आपल्या ३५ ते ४० टक्के कॅलरीजच फक्त जळतात.
याचाच स्पष्ट अर्थ असा, जर तुम्ही कमी झोपत असाल, तुमची जागरणं जास्त असतील, तर तुमच्या कमी कॅलरीज जळतील आणि त्यामुळे अर्थातच तुमचं वजन वाढेल!
हे जर सातत्यानं होत गेलं, तर तुमच्या पोटाचा नगारा व्हायला वेळ लागत नाही.
झोप आणि वजन यांचं ‘मैत्र’ आहे ते असं!