झिका व्हायरसचा वाढतोय धोका, जाणून घ्या याची लक्षणं आणि बचावाचा उपाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:04 AM2024-07-04T10:04:11+5:302024-07-04T10:05:00+5:30
Zika Virus Symptoms and Prevention : झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि यापासून बचावासाठी काय उपाय करावे हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे.
Zika Virus Symptoms and Prevention : झिका व्हायरसची लागण झाल्याचे रूग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने चिंता व्यक्त करत सावध राहण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळा आला की, डेंग्यू आणि झिका व्हायरसचा धोका वाढतो अशात खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अशात झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि यापासून बचावासाठी काय उपाय करावे हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे.
एडीज डासाने होते झिका व्हायरसची लागण
झिका व्हायरसची लागण एडीज डास चावल्याने होते. हेच डास डेंग्यू आणि चिकनगुनियाचं कारणही ठरतात. या व्हायरसची लागण गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला होते. हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडामध्ये आढळला होता. हा व्हायरस इथे एका झाडावर आढळला होता.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका व्हायरसची लागण झालेल्या ५ पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. व्हायरसने ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.
बचावासाठी उपाय?
- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
- ज्या ठिकाणी हा वायरस पसरला आहे तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान ८ आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.