Zika Virus: देशात वाढतोय झिका वायरसचा धोका, कशी घ्याल काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 10:31 AM2018-10-08T10:31:46+5:302018-10-08T10:32:20+5:30
एका बातमीनुसार झिका हा वायरस जयपूरमध्ये पोहोचला असून याने आरोग्यासंबंधी चिंता वाढली आहे. दिल्लीमध्येही झिका वायरसचा धोका वाढला आहे.
एका बातमीनुसार झिका हा वायरस जयपूरमध्ये पोहोचला असून याने आरोग्यासंबंधी चिंता वाढली आहे. दिल्लीमध्येही झिका वायरसचा धोका वाढला आहे. कारण जयपूरहून दिल्ली दूर नाहीये. अशात डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या डेंगूचाही धोका सगळीकडे वाढला आहे. डॉक्टरांना याची चिंता आहे की, डेंगू पसरवणाऱ्या अॅसिड डासामध्ये झिका वायरस ट्रान्सवर करण्याची क्षमता आहे. चला जाणून घेऊ याची लक्षणे...
कोणतही औषध नाही
झिका वायरसपासून बचाव करण्यासाठी अजून कोणतही औषध उपलब्ध नाहीये. अशात स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमात्र झिका वायरसचा धोका टाळण्याचा उपाय आहे. झिका वायरस हा पहिल्यांदा १९४७ मध्ये आढळला होता. याच वायरसमुळे ब्राझिलमध्ये गेल्यावर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. इथे साधारण दीड लाख लोक या वायरसने प्रभावित झाले होते.
झिका वायरसची लक्षणे
झिका वायरसचा संसर्ग झालेल्या ५ पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. वायरसने ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. वायरसची लागणे झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. ज्या लोकांना या वायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.
काय कराल उपाय?
- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
- ज्या ठिकाणी हा वायरस पसरला आहे तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान ८ आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.