महापौर, आयुक्तांनी आता दिला हा इशारा... सावध रहा अन्यथा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 02:01 PM2020-04-23T14:01:24+5:302020-04-23T14:06:34+5:30
भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीविक्री करीत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो; म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधिकारी यांची बैठक पार पडली
कोल्हापूर : भाजी विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने शहरातील भाजीविक्री बंद करावी लागेल, असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी बुधवारी दिला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर यापुढे मास्क व हॅँडग्लोव्हज न वापरणाऱ्या दुकानदार व भाजी विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला.
भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीविक्री करीत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो; म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असून भाजी व फळविक्रेत्यांनी शहरात फिरती करून भाजी व फळे विक्री करावी किंवा भाजीविक्रीस आठवड्यातून दोन दिवस द्यावेत यावर बैठकीत चर्चा झाली. नागरिक हळूहळू घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोनाचे गांभीर्य राहत नाही. कोरोना संसर्गाचा धोका बळावू शकतो, असे मत बैठकीत अनेकांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शहरात येण्यापेक्षा शहराच्या प्रवेशद्वाराजवळील भागामध्ये भाजीविक्री करावी. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि विक्रमनगर या भागांत ज्यांना फिरत्या पद्धतीने भाजी विक्री करायची आहे, त्यांनी ती करावी. ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला होलसेल विक्रीचे विकेंद्रीकरण करावे. गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे महापौरांनी सांगितले.
आयुक्त कलशेट्टी यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात सर्व अत्यावश्यक उपाययोजना केल्या जात असून, त्या अधिक कडकपणे राबविल्या जातील, असे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, हसिना फरास, रिना कांबळे, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, इस्टेट आॅफिसर सचिन जाधव, आश्पाक आजरेकर, महेश उत्तुरे उपस्थित होते.