त्या अधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा; अन्यथा करणार क्वारंटाईन -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:41 AM2020-04-17T11:41:06+5:302020-04-17T11:43:02+5:30
कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करून
कोल्हापूर : कामाचा बहाणा करून सीमाबंदीचे उल्लंघन आणि कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जर कोणी शासकीय अधिकारी गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिला. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमधील निर्बंध दि. २० एप्रिलनंतरही कायम राहतील. त्याबाबत राज्य सरकारच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करून सीमाबंदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. कोरोनाबाबत कोल्हापूर जिल्ह्याचा ‘हॉटस्पॉट क्लस्टर’मध्ये समावेश झाला आहे. कोरोना प्रादुर्भावाची जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेता दि. २० एप्रिलनंतरही लॉकडाऊनमधील निर्बंध सध्या जसे आहेत, तसेच राहणार आहेत. त्याबाबत राज्य सरकारच्या आदेश, सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पीपीई किटस् पुरेशी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यास जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोनाबाबतची तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संस्थात्मक अलगीकरणासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांची वसतिगृहे, काही इमारती ताब्यात घेतल्या आहेत. त्याठिकाणी एकूण सुमारे १० हजार जणांची व्यवस्था करता येईल. जिल्ह्यात पीपीई किटस् पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याची कमतरता नाही. सध्या चार हजार पीपीई किटस् उपलब्ध आहेत. एक दिवसआड पाचशे किटस् जिल्हा प्रशासनाला मिळत असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.