आग लागलीच तर काय कराल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:18 PM2018-01-04T17:18:38+5:302018-01-04T17:20:34+5:30
गर्दीच्या ठिकाणीच कशाला दुर्देवानं आपल्या घरी आग लागली तर काय कराल? -पळू नका, डोकं वापरा.
मुंबईत कमला मिल आग प्रकरण ताजे असतानाच मुंबईत एका रहिवाशी इमारतीत आग लागून एक कुटुंब होरपळून दगावले. आग लागली की भीती वाटतेच, माणसं सैरावैरा पळतात. त्यात आपल्याकडे परदेशासारखं आगीच्या संदर्भातलं नागरी प्रशिक्षण नसतं. तसं मॉक ड्रिल केले जात नाहीत. मुलांना आपण साध्या नागरी गोष्टी शिकवत नाहीत, कारण त्या मोठ्यांनाच येत नाही. मात्र सध्याच्या काळात काही गोष्टी आपल्याला किमान माहिती असणं आवश्यक आहे. अनेकदा आगीत भाजून दगावलेल्यांपेक्षा धुरात गुदमरुन गेलेल्यांची संख्या जास्त असते, असं आकडेवारी सांगते. असे प्रसंग कुणाच्याही वाटय़ाला येऊ नयेत. अगिAशामक दलाला फोन करण्याबरोबरच काही खबरदारीचे उपाय आपण शिकून घेतले पाहिजेत.
1) थोडं स्पार्किग, थोडा शॉक, दुर्लक्ष करताय?
घरात वीजेच्या बटणात कधी स्पार्किग होतं. कुठं करंट लागतो. आवाज येतात. एक बटण ऑन केलं तर भलतं बंद होतं. असं काही घरात घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एसी, मिक्सर, गिझर यासारख्या उपकरणांची काळजी घ्या. बिघाड झाला असेल तर वापरू नका.
2) छोटे मोठे शॉक
घरात अनेकदा छोटे मोठे शॉक लागतात. त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण तसं करू नये, हे दुर्घटनेला आमंत्रण ठरू शकतं.
3) आग लागलीच तर
बाहेर पडा. पण शांतपणे. चेंगराचेंगरी, आरडाओरडा न करता. त्या गर्दीतही पाण्यानं ओला रुमाल तोंडाभोवती लावा. जर कुठं अडकलात तर पडदे, चादरी, टॉवेल, कपडे जे मिळेल ते ओले करुन दारांच्या फटी, उंबरठे, खिडक्यांना लावा. त्यानं धूर शोषला जाऊन, तीव्रता कमी होवू शकते.
4) मॉलमध्ये जाताय.
नेहमीचा मॉल असला नसला तरी एक्झिट कुठून आहे हे पाहून ठेवा. नकाशे वाचायला शिका.
5) फोटोशूटची हौस टाळा
आग लागलेली असताना काहीजणांना शुटिंगचा मोह होतो. तो टाळा. जीव प्यारा, शूट नव्हे.