बॅँकेच्या लॉकरमध्येच चोरी झाली तर बॅँक नुकसान भरपाई देईल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:06 PM2017-11-14T16:06:02+5:302017-11-14T16:11:43+5:30
आपण मोठय़ा विश्वासानं बॅँकेच्या लॉकरमध्ये सोननाणं ठेवतो, पण तिथून काही गहाळ झालं, चोरीला गेलं तर?
-ललिता कुलकर्णी
आपण बॅकेंच्या लॉकरमध्ये मोठय़ा ग्राहकानं लॉकरमध्ये ठेवलेल्यापैकी काही किंवा ऐवज गहाळ झाले किंवा चोरीला गेले तर बँक नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असते का? असा प्रश्न नवी मुंबईत काल झालेल्या चोरीनं पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. आणि लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणं कितपत सुरक्षित असाही प्रश्न आहेच. त्यात वृत्तपत्नातील बातम्या सांगतात की, बॅँक जबाबादार नाही. रिझव्र्ह बॅकेचे विधानही पुराव्यादाखल सांगितले जाते. मात्र रिझव्र्ह बँकेच्या विधानामागील युक्तिवाद असा की बँक आणि लॉकरधारक यांच्यातील नातं घर भाड्यानं देणारा आणि भाडेकरू या स्वरूपाचं असतं . भाडेकरूच्या घरात चोरी झाली तर मालक त्याला नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नसतो. त्याचप्रमाणे लॉकरमधील ऐवज चोरीला गेला तर त्याबाबत बँकेची कोणतीही आर्थिक जबाबदारी नसते. पण तरीही लॉकरच्या बाबतीत बॅंक आणि लॉकरधारक यांच्यातील नातं, या नात्यातील विशेष जबाबदार्या, प्रत्येकाची कर्तव्य, दोघांचे हक्क याचं विशिष्ट स्वरूप आहे. हे स्वरूप लॉकरधारकांनी समजून घ्यायला हवं.
लॉकरधारकांना दिलासा देणारी बाब अशी की बँक लॉकरमधील वस्तूंच्या चोरीबाबतच्या अनेक तक्रारींमध्ये ग्राहक तक्रार निवारण मंच आणि आयोग यांनी बँकांचा हा युक्तिवाद अमान्य केला आहे . बँक आणि लॉकरधारक यांच्यातील नातं जागा भाड्यानं देणारा आणि भाडेकरू या स्वरूपाचं नसून ते बेली ( ज्यानं मूल्य घेऊन दुसर्याची वस्तू विश्वासानं सांभाळायला घेतली आहे ) व बेलर ( ज्यानं विश्वासानं वस्तू सांभाळायला दिली आहे ) अशा प्रकारचं म्हणजेच अधिक विश्वासाचं असतं अशी भूमिका ग्राहक न्यायालयांनी घेतलेली आहे . त्यामुळे एखादी जबाबदार व्यक्ती सर्वसामान्यपणे आपल्या स्वतर्च्या मालकीच्या वस्तूची जितकी काळजी घेईल तेवढी काळजी बेलीनं अर्थात बँकेनं लॉकर्सच्या सुरक्षिततेबाबत घ्यायला हवी . अशी काळजी बँकेनं घेतली नव्हती असं ज्या प्रकरणात ग्राहक सिद्ध करू शकले त्यात बँकेच्या सेवेतील उणीवेबद्दल ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय आयोगानं दिलेले आहेत .
नुकसानभरपाई मिळते का?
लॉकरमध्ये कोणता आणि किती किंमतीचा ऐवज ठेवला होता याची बँकेला कल्पना नसल्यानं नुकसानभरपाई किती द्यावी हा वादाचा विषय होऊ शकतो. सर्वसाधारणपणे ग्राहकानं तक्रार अर्जामध्ये ऐवजाबद्दल शपथेवर जे नमूद केलं असेल त्यावर आधारित नुकसानभरपाई तारतम्यानं ग्राहक न्यायालयं मान्य करतात असं दिसतं.
येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती अशी की ग्राहक न्यायालयं नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार निर्णय देतात. याउलट सर्वोच्च न्यायालयानं केवळ कायद्याच्या कसोटीवर तपासून काही प्रकरणात बँकांना लॉकरचोरीच्या प्रकरणात जबाबदारीतून मुक्तही केलं आहे. असं असलं तरीही ग्राहकांचा आपल्या बँकेवरील विश्वास टिकून राहावा आणि आपलं नाव खराब होऊ नये म्हणून बँका लॉकरच्या सुरक्षिततेचे नियम पाळण्याची काळजी घेतात . त्यामुळे लॉकरचोरीच्या घटना फारच अपवादात्मक असतात. अर्थातच ग्राहकांनी रिझव्र्ह बँकेच्या विधानानं घाबरून जाण्याचं कारण नाही . मात्न आपल्या लॉकरच्या सुरक्षिततेसाठी ग्राहकानंही थोडी काळजी घ्यायला हवी.
लॉकरमध्ये ऐवज ठेवताना
1) सर्वात प्रथम लॉकरसंबंधीचे बँकेचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्या आणि नियमांचं पालन करावं .
2) लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची यादी आपल्याजवळ ठेवावी . तसेच चांदी सोन्याच्या वस्तूंच्या खरेदीच्या पावत्याही जपून ठेवाव्यात. जेणेकरून चोरी झाल्यास आपला क्लेम ठरवणं आणि पुरावा देणं सोपं होईल .
3) काम झाल्यावर लॉकरबाहेर काही राहिले नाही आणि लॉकर नीट बंद झाला आहे याची खात्नी करून घ्यावी.
4) वर्षातून किमान दोनतीन वेळा लॉकर उघडावा . त्यामुळे आपला ऐवज सुरक्षित आहे याची खात्नी करून घेता येते . तसेच लॉकर दुर्लक्षित नाही हे बँकेला आणि संबंधित कर्मचर्यांनाही समजतं. कोणत्याही कारणानं बराच काळ लॉकर उघडू शकणार नसलो तर बँकेला तसं कळवून लॉकरची विशेष काळजी घेण्याची सूचना करावी .
5) लॉकरची मूळ किल्लीच सुरक्षित ठेवावी . डुप्लिकेट किल्ली बनवून घेऊ नये .
(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या आहेत)