बुडित मजुरीसाठी १ कोटी २३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:22 AM2018-12-12T00:22:53+5:302018-12-12T00:23:37+5:30
गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच्या निधीस मानव विकासकडून मंजुरी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच्या निधीस मानव विकासकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मानव निर्देशाक उंचविण्यासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. अनुसूचित जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर व बाळंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. गरोदरपणात आणि प्रसुतीनंतरचा कालावधीत मानव विकासकडून मातांची मजुरी बुडते. सदर महिला आर्थिक लाभासाठी मजुरी करण्यासाठी किंवा कामावर जाऊ नये याची काळजी घेत बुडित मजुरी दिली जाते. प्रथम दोन हजार आणि प्रसुतीनंतर दोन हजार रुपये एकूण चार हजार रूपये अशी लाभाची रक्कम देऊन महिलांना अर्थसहाय्य करण्यात येते. जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली या तीन तालुक्यांचा मानव विकासमध्ये समावेश आहे. अपेक्षित लाभार्थी महिलांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १०७२ लाभार्थी महिलांचा समावेश आहे. तर सेनगाव तालुक्यातील १०९३ आहे. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील ९२४ याप्रमाणे एकूण ३०८९ महिलांना बुडित मजुरी देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
सदर निधीस मानव विकासकडून मंजुरी मिळाली असली तरी, अद्याप याबाबत आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले नाही. तालुका स्तरावरून याद्याही अप्रपाप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम कधी वर्ग होईल हे सांगणे कठीण आहे. आरोग्य खात्याच्या संबंधित विभागाकडून नियोजनाची प्रक्रिया सुरू असली तरी ही कामे संथपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर विनाविलंब लाभाची रक्कम जमा करणे गरजेचे आहे. शिवाय ही कामे जलदगतिने करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना शासनाकडून दिली जाणारी बुडित मजुरीची रक्कम वेळेत मिळण्यास मदत होईल.
मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाकडे गरोदर मातांना बुडित मजुरी म्हणून अर्थसहाय्य करण्यासाठी १ कोटी २३ लाख ५६ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी तसेच औषधोपचार व शिबीरे यासाठी ४६ लाख ८ हजार रूपये निधीस मंजूरी देण्यात आली आहे. दोन्ही निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मानव विकास अभियानकडून देण्यात आली. त्यामुळे आरोग्य खात्याने लाभार्थी महिलांना बुडित मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत वर्ग करणे गरजेचे आहे.