१०५ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:35 AM2021-09-17T04:35:42+5:302021-09-17T04:35:42+5:30
हिंगोली : प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्ह्यात जवळपास १०५ एस.टी. बसेसला कोटिंग करण्यात आले आहे. वर्षातून चार ...
हिंगोली : प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्ह्यात जवळपास १०५ एस.टी. बसेसला कोटिंग करण्यात आले आहे. वर्षातून चार वेळा बसेसला कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
२३ मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला असून, अजूनही एक-दोन रुग्ण रोजच आढळून येत आहेत. प्रवाशांना प्रवास करतेवेळेस कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून एस. टी. महामंडळाने २७ जुलै २०२१ रोजी बसेसला कोटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजमितीस जिल्ह्यातील हिंगोली आगाराने ४०, वसमत आगाराने ४० आणि कळमनुरी आगाराने २५ बसेसला कोटिंग केले आहे. ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू नाहीत. प्रवासी खासगी वाहनांनी शहराच्या ठिकाणी येत आहेत. गावी जाताना जी बस मिळेल त्याने घर जवळ करीत आहेत. कोरोना संपला असे समजून अनेक प्रवासी मास्क न लावताच बिनधास्तपणे प्रवास करीत आहेत.
किती बसेसला कोटिंग?
हिंगोली ४०
वसमत ४०
कळमनुरी २५
वर्षातून चार वेळा कोटिंग...
अँटी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया काही जिल्ह्यांत पूर्ण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र अजून बाकी आहे. कंपनीचे प्रतिनिधी येऊन कोटिंग करून देत आहेत. वर्षातून चार वेळा हे कोटिंग केले जाईल, असे तांत्रिक विभागाचे पर्यवेक्षक सिद्धार्थ आझादे यांनी सांगितले.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही...
बसमध्ये एखादी बाधित व्यक्ती येऊन गेल्यानंतर धोका नाही; पण बाजूला कोणी बसले असेल तर प्रवाशांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. बाजूला बसलेली व्यक्ती बाधित आहे की नाही हे कोणालाच कळत नाही. बसमध्ये बसल्यानंतर अनेक प्रवासी मास्क घालत नाहीत. कोरोना संपला या आविर्भावात काहीजण पाहायला मिळत आहेत.
प्रवासी काय म्हणतात...
महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेसला कोटिंग केले आहे. ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग केले की नाही, हे मात्र कळायला मार्ग नाही. ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग करणे महत्त्वाचे आहे.
-अनिल आढळकर, प्रवासी
लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करून चार महिने लोटले आहेत. अजूनही ग्रामीण भागातील बसेस सुरू केलेल्या नाहीत. कोरोनाचा धोका ओळखून ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग करून प्रवाशांच्या सोयीकरिता महामंडळाने बसेस सुरू करणे गरजेचे आहे.
-मारोती कल्याणकर, प्रवासी
प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून महामंडळ बसेसला कोटिंग करीत आहेत. जवळपास १०५ बसेसला कोटिंग केले आहे. अजून काही बसेस कोटिंग करायच्या बाकी आहेत. कोटिंग केले तरी प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस सामाजिक अंतर ठेवत मास्कचा पुरेपूर वापर करावा.
-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख