जलयुक्त शिवारचे १0.७१ कोटी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:14 AM2019-03-15T00:14:54+5:302019-03-15T00:15:54+5:30
जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे.
जलयुक्त शिवार योजनेत कृषीच्या मंजूर १४९५ पैकी १३२५ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर्ण झालेली कामे मात्र ८१५ आहेत. उर्वरित कामे पूर्ण होणे बाकी आहे. लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या ४२६ कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र पूर्ण झालेली कामे २११ आहेत. लघुसिंचन जि.प.च्याही ९५ कामांची निविदा प्रक्रिया झालेली आहे. तर पूर्ण झालेली ४८ कामे आहेत. वन विभागाच्या निविदा झालेल्या ५६ कामांपैकी २५ पूर्ण झालेली आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा जि.प.च्या १९५ कामांची निविदा प्रक्रिया झाली तरीही एकही पूर्ण नाही. भूजल सर्वेक्षणच्या १३५ कामांची निविदा प्रक्रिया झाली असून आतापर्यंत ४२ पूर्ण झाली आहेत.
या विभागांनी कामे केली तरीही कृषी विभागाने २.६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित विभागांनी अजून खर्चच दाखविला नाही. तर कृषी विभागाकडे जलयुक्तसाठी निधी आला असतानाही त्याची मागणी केली जात नाही. विशेष म्हणजे आचारसंहितेपूर्वी ही मागणी केल्यास कामांच्या तुलनेत निधी वितरित करणे सोपे होते. मात्र आता पूर्ण झालेल्या कामांनाच निधी देता येणार आहे. त्यामुळे आता येनकेनप्रकारे ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या कामांचाही खर्चच दाखविला नसल्याचेही दिसत आहे.
जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर आहेत. मात्र आतापर्यंतही या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र कायम आहे. मंजूर झालेली व सुरू असलेली ही कामे असल्याने या कामांना गती देणे आवश्यक आहे. यंदा आधीच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यात पुढील वर्षी तरी या कामांचा फायदा संबंधित गावांना होणार आहे. यंदा तब्बल ११५ गावे जलयुक्त शिवारच्या यादीत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील गावांत कामांचे नियोजन व देखरेख सोपी नाही. त्यातही निवडणुकीचे वर्ष असल्याने यंत्रणा त्यातही अडकून पडणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेतील कामे करण्यास काही यंत्रणा तेवढ्या सजग आहेत. उर्वरित यंत्रणांना ही कामे नकोशी वाटतात. त्यामुळे जलयुक्त शिवारची कामे रखडण्याची दरवर्षीचीच बोंब कायम आहे.